हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात जागतिक महिलादिन साजरा
राजगुरुनगर : आपली कुटुंबसंस्था स्त्रियांचा त्याग व समर्पणावर उभी असून कुटुंब व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी त्या अत्यंत जबाबदारीने पार पाडत असतात. त्यामुळे स्त्रियांकडे आदर व समानतेच्या भावनेने पाहायला हवे. महिलांना संधी मिळाल्यावर प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपले वेगळेपण सिध्द केले असल्याने जागतिक महिला दिन हा स्त्रीत्वाचा उत्सव म्हणून साजरा व्हायला हवा.असे मत उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे यांनी मांडले. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या समारोपप्रसंगी कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे बोलत होते. या वेळी डॉ.बी.डी.अनुसे, प्रा.एम.एल.मुळूक, प्रा. व्ही. व्ही. कांबळे, डॉ.व्ही.वाय.रासकर, प्रा.गणेश धुमाळ, प्रा.संदीप थोरात, प्रा.संदीप ढोरे, प्रा.गणेश मोढवे उपस्थित होते.
आर्थिक सक्षमीकरणाचा विचार करावा
डॉ. शिंदे म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षण घेताना विद्यिर्थिनींनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अर्थ समजून घेऊन आपल्या अस्मितेचा सार्थ अभिमान बाळगायला हवा. समान हक्क, संधी, दर्जा आणि स्वातंत्र्य हा स्त्रियांचा मूलभूत अधिकार असून केवळ स्त्री म्हणून होणारे अवमूल्यन व शोषणाची त्यांना जाणीव व्हायला हवी असे सांगितले. स्वत:मधील दुर्बलता बाजूला सारुन स्वबळावर भरारी घेण्याचे स्वप्न पाहाताना आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने प्राधान्याने विचार करायला हवा, असे आवाहन त्यांनी केले.
विविध उपक्रमांचे आयोजन
दि. 1 ते 8 मार्च दरम्यान जागर जाणिवा अभियानांतर्गत ’काळाच्या पुढे असणार्या स्त्रिया’ या विषयावर परिसंवाद, ’उंच माझा झोका’ या विषयावर मुक्त संवाद, स्त्रीवादी साहित्याची ओळख, मी मुलगी बोलतेय, स्त्रीभ्रूणहत्या एक सामाजिक कलंक, मुलगी शिकली प्रगती झाली, मला काय हवं! या विषयांवर निबंध स्पर्धा, आदि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात 300 पेक्षा अधिक विद्यार्थिनी सहभागी झाल्या.
विद्यार्थिनींचा गौरव
कल्याणी दौंडकर, अश्विनी धाडगे, कीर्ती कोहिणकर, सोनाली भांबुरे शितल भुजबळ, अंकिता पोखरकर, प्रतीक्षा पाटोळे, मयुरी सैद, दिपाली ढमाले, निकिता बनकर, प्राजक्ता मांजरे, पूजा सांडभोर, ऋतुजा वाळुंज या विविध स्पर्धा विजेत्या विद्यार्थिनींना साधना साप्ताहिकाचा महिला दिन विशेषांक देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी कोमल गायकवाड, अक्षदा वाघ, प्राजक्ता गदादे या विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली. विद्यार्थिनींना देण्यात आलेल्या आत्मनिर्भरतेच्या शपथेचे वाचन प्रा.व्ही.व्ही.कांबळे यांनी केले तर आभार प्रा.एम.एल.मुळूक यांनी मानले.