फैजपूर । स्त्रिला अनेकविध भूमिका बहिण, पत्नी, माता आदी पार पाडाव्या लागतात. व्यक्तिमत्व विकसित झालेली स्त्री कुटुंबाला सुखी ठेवू शकते. सर्वच क्षेेत्रात स्त्रियांनी प्रगती केलेली आहे. कार्यशाळेतून नेतृत्व गुण विकसित करा, वाचन करा, जिजाऊ मातेमुळेच शिवराय घडले त्यामुळे त्यांचा आदर्श बाळगण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी यांनी केले.
विद्यार्थी कल्याण विभागाचे सहकार्य
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभाग आणि धनाजी नाना महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवती सभेंतर्गत विद्यार्थीनी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा पार पडली. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ. चौधरी बोलत होते.
तरुणींनी स्वत:तील दुर्गा ओळखावी
गौरी थोरात यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. प्रथम सत्रात गौरी थोरात यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, अभ्यासाबरोबर चर्चा खुप महत्वाची आहे. कोणत्याही गोष्टीला परिपूर्ण निर्णयामुळे महत्व येते. आपले आई, वडिल आपल्या पाल्यांच्या कल्याणाचाच प्रयत्न करतात. आई, वडील आपले करियर घडविण्यास मदत करतात. विद्यार्थी दशेत भरपूर अभ्यास करावा. आई, वडिलांना विश्वासात घ्या. समाजाचा विरोध पत्करुन मुलींना सावित्रीबाईंनी शिक्षण दिले म्हणूनच आपण शिक्षण घेत आहोत. सिंधूताई सपकाळ सर्व जगाची माय बनल्या. स्वतःतील दुर्गा ओळखा. राणी लक्ष्मीबाईची ताकद आपल्या सर्वांमध्ये आहे ती ओळखा, असे आवाहन केले.
अंतरंगापर्यंत जावून समस्या सोडविण्याची क्षमता असावी
दुसर्या सत्रात डॉ. एस.व्ही. जाधव यांनी महाविद्यालयीन युवतींपुढील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन केले. शिक्षणाने समायोजन क्षमता वाढली पाहिजे. विवाहानंतर कुटूंबात सर्वांशी जुळते घेता आले पाहिजे. सर्वांना सांभाळण्याची जबादारी घेता आली पाहिजे. केवळ नैसर्गिक धर्माने आई न होता आपल्या बाळाच्या पाठीमागे राहून आदर्श निर्माण करता आला पाहिजे तसेच मुलांच्या अंतरंगापर्यंत जावून समस्या सोडविण्याची क्षमता असावी, वाचन, मनन, चिंतनाने काही गोष्टी जिवनात मिळविता येतात असेही ते म्हणाले. चौथ्या सत्रात प्रा.डॉ. रश्मी शर्मा यांनी व्यक्तिमत्व विकासासंबंधी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक युवती सभा प्रमुख लता पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. उदय जगताप, डॉ. ए.आय. भंगाळे, प्रा. ए.जी. सरोदे, प्रा. डी.बी. तायडे, डॉ. सिंधू भंगाळे, डॉ. कल्पना पाटील, प्रा. रेखा चौधरी, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. जी.जी. कोल्हे यांनी सहकार्य केले. सुत्रसंचालन प्रा. शुभांगी पाटील यांनी केले. प्रा.डॉ. सविता वाघमारे व प्राजक्ता काचकुटे यांनी आभार मानले.