शृंगारच सार्या सौंदर्याचे देखणेपण आहे असे नाही. निरागस सोज्वळताही सौंदर्याला दीपवणारी असते. त्यामुळे सौंदर्याचे बखान हे दृष्टीवर आणि दूरदृष्टीवर अवलंबून असते. दृष्टिकोन आकर्षणाच्या टोकावर असेल तर सौंदर्य कामापुरते आहे असे म्हणता येईल. पण दृष्टिकोन जर का निरागस नजरेवर असेल तर ते सौंदर्य चिरंतन असते. याकारणे आपल्या सहवासाची आंतरक्रियाही अपूर्व आनंदाचा सोहळा असते. खरे तर सौंदर्य म्हटले की सर्वात आधी आठवते स्त्रीदेह! चावून चघळून चोथा झालेला विषय पुन्हा पुन्हा हाताळण्याचे भोग मनावर वेदनेचा कलप चढवतात. विकृतीत मत्त झालेला समाज दुःखाचा बाजार उभा करतो आणि पुन्हा पुन्हा पोळल्या जाते स्त्री…स्त्रीत्व…तिचे अस्तित्व! तिच्या देहाचा शृंगार थाटल्या जातो, तो बेअब्रू केल्या जातो. कुठे आत्महत्या आणि सांत्वनाचे गीतही गायिल्या जाते. प्रेम, तीव्र वासनेच्या विळख्यात जखडल्या जातेय याची सार्याच बायकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. यात नात्यांचे बंधन नाही, विश्वासाची भाषा नाही, भर रस्त्यात, भर चौकात, दिवसाढवळ्या, मिट्ट काळोखात, घरात, बाजारात. स्थळ, काळ, परिस्थिती, कशा-कशाचेच तारतम्य न बाळगता इतिपासून ते अंतापर्यंत नागवली जाते स्त्री! मान, अब्रूच्या शब्दांनी स्त्रियांचा आदर साकार करणारे ढोंगी समाजसुधारक उंबर्याचा आवाज दाबून स्त्रीसबलीकरणावर एखाद्या भाषणातून जाहीर बोलतात. या परिवर्तनाच्या युगात स्त्री ही नेमकी काय आहे समाजासाठी, ह्याचे खुलासे मागावे आता स्त्रियांनी? आज प्रचंड चीड येतेय, का? याचा विचार करताना शाळेतून परतताना प्रियाच्या स्तनावर भर रस्त्यात एका माणसाने जोराचा हात मारलेला आठवतो. तिचे खाली बसून किंचाळणे आठवतेय. ऑटोरिक्षातून शाळेत जाताना एखाद्याने संधी साधताना मीनाने सेफ्टी पिन टोचलेली आठवतेय. शेजारच्या वेड्या राधिकाला तोंड दाबून भोगलेले आठवतेय. तीन वर्षांनी मनी? काय झालं तिचे? दिसलीच नव्हती नंतर आणि चिरफाडीसाठी आणलेल्या स्त्रीशवाला भोगताना चिरफाड करणार्याला कोणत्या आनंदाचा प्रत्यय आला असावा? बलात्कारित अरुणा, निर्भया, आसिफा, छकुली. बलात्कार करून नुकतीच जाळून कोळसा केलेली डॉ. प्रियांका आणि आता प्रेमासाठी नकार दिला म्हणून आमच्याच गावाजवळील (हिंगणघाट) एका दोन लेकरांच्या बापाने जाळलेली प्राध्यापिका अंकिता! ऐकताच देहासह मनही पेट घेते. इतका स्वस्त झालेय स्त्रीमन-स्त्रीदेह की, ज्याने त्याने अन्याय अत्याचाराचे सत्र सुरू ठेवावे? अंकिताचा चेहरा जळाला, वाचाही गेली आणि म्हणे कदाचित दृष्टीही जाईल. इतक्या निरर्थक जन्माला आल्या आहेत स्त्रिया की, कोणी क्षणात भस्म करावे? हे विश्व जिच्या आधारावर उभे आहे अशा स्त्रीला समाजात अशा घटनांचा बळी पडताना पाहून मन पुन्हा स्वतःला पुरातनकाळात संकुचिततेत गुरफटू पाहतेय. मानव ही निसर्गाची सर्वोत्तम कलाकृती आहे. सर्वात बुद्धिमान प्राणी मानव आणि हा बुद्धिमान प्राणी आपली बुद्धी विकृतीत भ्रष्ट करतोय. या किळसवाण्या वृत्तीची ओकारी यायला लागलीय आता. स्त्री-पुरुष परस्परपूरक आहेत. एकमेकांशिवाय अपूर्णही आहेत. विषमलिंगीयांमधील मर्यादांच्या आधारावर समाजाने विवाहबद्धता ठरविली आहे. मात्र या मर्यादांना पौरुषत्व, त्याचे उद्दीपन आणि त्यातून निर्माण होणारी घातक प्रवृत्ती आता जुमानत नाही. प्रत्येकवेळी गुन्हेगार आणि गुन्ह्याचा बळी हा वेगळा आणि नवीन असतो. पूर्वी घडलेल्या गुन्ह्याचे परिणाम तो ऐकून असतो मात्र भोगून नसतो म्हणून तर तो हे कृत्य करायला धजावत नाही ना की एखादे वाईट कृत्य केल्यावर आपल्याला शिक्षा होईल याची त्याला भीतीच नसावी की, तमाच नसावी की, काहीही झाले तरी बळीचा बकरा बनवायलाच हवा असा निग्रह असावा?
सार्या प्रश्नांचा विचार करता एकतर स्त्रियांनी पुरुषांपेक्षा बलवान व्हायला हवे अथवा स्त्रियांना जन्मालाच घालू नये. कदाचित ही स्त्रीबीजेच संपून गेली तर वासनेचे भोगही संपून जातील. पौरुषत्वाचा अहंकारही आपोआप जळेल! आयुष्य हे जगण्यासाठी असते. आयुष्य फार सुंदर असते. आपल्या कर्तृत्वाच्या सौंदर्यवान झालरीने ते आकर्षकही होते पण ते जगायला आपण शाबूत असावे नां? हे आता स्त्रियांनीच ठरविण्याची गरज आहे. स्त्रियांनीच… देशातील सार्याच स्त्रियांनी!
- गीता देव्हारे-रायपुरे,
चंद्रपूर, मो. 9975349555