स्त्रीच्या गर्भाला जीवदान देणे काळाची गरज

0

फैजपूर  । समाजात स्त्रीभृणहत्येची समस्या गंभीर आहे. फैजपूर हा ग्रामीण भाग असूनही याठिकाणी मुलींची संख्या लक्षणिय दिसत आहे. तरुण-तरुणींनी स्त्री भृणहत्येसंबंधी प्रबोधन करुन जनजागृती करावी. आम्हीही रंगमच, नाटकाद्वारे प्रबोधन करीत असून स्त्रीचा गर्भ पोटात न मारता तिला जीवदान देणे आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मराठी सिनेअभिनेता संदिप पाठक यांनी केले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभाग आणि धनाजी नाना महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठस्तरीय युवारंग 2016 चा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

विद्यार्थ्यांचा जोश पाहून भारावलो
युवारंगचे विशेष अतिथी सिनेअभिनेता तथा नाटककार संदिप पाठक यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून मी जाम खुश असल्याची भावना व्यक्त केली. माजलगाव सारख्या एका खेडेगावात गरीब कुटुंबातील जन्माला आलेला मी आज व्यासपीठावर महनिय अशा ज्येष्ठ श्रेष्ठांजवळ बसण्याचा मला मान मिळाला हे माझेे भाग्य समजतो. गेल्या 15 वर्षांत झाला नसलेला असा भव्यदिव्य स्वागत सोहळा आज मी येथे अनुभवला म्हणून मी व्यासपीठावरुन खाली उतरुन आपल्यासोबत सेल्फी काढला व माझ्या फेसबुक, ट्विटरवरही टाकला. येथे येवून मी धन्य झालो. लग्नानंतर प्रथमच माझ्या अंगावर फुले पडली. मी चाळीशीत असूनही येथील विद्यार्थ्यांचा जोश पाहून भारावून गेलो आहे.
युवारंगचे व्यासपीठ तुमच्यासाठी खुप महत्वाचे व मोठे व्यासपीठ आहे. मी एका खेड्यातून मुंबईत गेलो. सुरुवातीला मीच माझ्याकडे पाहत होतो. मात्र आज हे चित्र बदलले आहे. यासाठी आपली मेहनत, जिद्द महत्वाची असतेे. आज नावापेक्षा आडनाव ऐकण्यात लोक जास्त महत्व देतात मात्र संदिप पाठक याला अपवाद आहे. आपल्या कर्मावर आपला विश्‍वास पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.