बिनधास्त वागण्यावर बोटं दाखवता येतं. त्यामुळे त्यांना जरा बाजूलाच ठेवू. पण निष्पाप अबोध कळ्या जर कधीही-कुणाकडूनही कुस्करल्या जात असतील तर तो दोष कुणाचा? दहा वर्षांची मुलगी गरोदर. तेरा वर्षांच्या चिमुकलीने दिला बाळाला जन्म. असल्या बातम्या ऐकता-वाचताना घरोघरीच्या लेकी-बाळींचे पालक कुठल्या अवस्थेतून जात असतील याची कल्पना करा. कालपर्यंत अपरिचितांकडून धोका होता. आता शाळेची बस, शाळेचे वर्ग-पटांगण – स्वच्छतागृह काहीच सुरक्षित नाही. बाकीच्यांचे सोडा, शाळा-क्लासेसच्या शिक्षकांनीच मुलींचे शोषण केल्याच्या बातम्या, व्हिडिओ सर्रास पाहायला मिळतात. घराच्या चार भिंतीबाहेर, शेजारीपाजारी असंख्य वासनांध जीव नात्यांची झूल पांघरूण वावरत असतात. बरं घरातच कोंडून ठेवायचं म्हटलं तर ते शारीरिक-मानसिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही, आणि त्यातही तो पर्याय निवडूनही सुरक्षिततेची खात्री नाही. घरातीलच कुणी किंवा इथे ये-जा करणारं कुणी कधी घात करेल याची खात्री नाही. मान्य आहे प्रत्येक जण तसा नसतो, पण अशी एखादी घटना घडून जाईपर्यंत कुठलीच व्यक्ती अशी विकृती मिरवत नाही. मग विश्वास कुणावर ठेवायचा आणि संशय कुणावर घ्यायचा?
काही जण म्हणतात, मुलांना गुड टच, बॅड टच शिकवा. नक्कीच! स्वसंरक्षणसुद्धा शिकवू. पण हे झालं किमान जाणत्या मुलांसाठी. दोन-तीन वर्षांच्या बाळाला तुम्ही कितीही सांगा, चॉकलेट दिसलं, तर ते जाणारच. बरं देणारा कुणी अपरिचित असेल, तर ते नाकारतीलही, पण रोजच्या माणसावर संशय घेणं आपल्याला जमत नाही, तर त्यांना काय सांगणार? शिवाय प्रत्येक माणसाकडे असे संशयाने बघत, सावध जगायचे म्हटले, तर त्या कोवळ्या मनांवर काय आघात होणार? जे जग त्यांनी अजून पूर्ण पाहिलेलंही नाही, तिथे पावलापावलावर हिंस्त्र श्वापदे दबा धरून बसलेली आहेत, हे जाणल्यानंतरची त्यांची नेमकी मनःस्थिती कशी असेल? सुमसान रस्त्यावरून एकटं चालताना भल्याभल्यांना राम आठवतो, मग या चिमुरड्यांना असं भावनिकदृष्ट्या एकटं पडल्यावर काय वाटत असेल. जगण्याच्या वाटेवरील या काचा, इतक्या लहान वयातच उजागर झाल्यांनतर त्या कोवळ्या मनांवर काय ताण येत असेल? उगीच नाही आठ-दहा वर्षांची मुलं किरकोळ कारणांवरून आक्रमक होतं. आई ओरडली – बाईंनी शिक्षा केली एवढंच कारणही आत्महत्या करायला पुरतं, कारण न कळत्या वयापासून जोपासलेली असुरक्षितता.
स्वतःवर, जगण्यावर विश्वासच राहिलेला नसेल, तर मग इतरांना-आजूबाजूच्या परिस्थितीला समजून घेण्याचे काही कारणच उरत नाही. शिवाय या मुलांना समजून घेणारे आजूबाजूला कुणी असेलच असे नाही. आपल्याकडे मुलांच्या प्रत्येक चुकीबद्दल आईवडिलांना दोष द्यायची मस्त फॅशन आहे. मान्य आहे, आईवडिलांचे संस्कार मुलांच्या जडणघडणीत भूमिका बजावतात. पण आजकाल ही भूमिका फार मोठी नसते. कारण दोन-अडीच वर्षांपासून मूल बाहेरच्या जगात वावरायला लागते. त्याआधीच टीव्ही-इंटरनेट प्रभाव पाडायला सुरुवात करतात. ठरावीक सुजाण पालकांनी मुलांना अशा गोष्टींपासून दूर राखायचे म्हटले, तरी ते शक्य होत नाही. आजूबाजूच्या वातावरणातून सगळेच गंध मुलांपर्यंत पोहोचत असतात.
सगळेच पालक काही मानसशास्त्राचे विद्यार्थी नसतात. कळत नकळत तेही प्रवाहपतित, मग बांध घालायचा तरी कुठे? जिथे शेकडा नव्वद टक्के भरकटलेले तिथे सुरक्षितता आणायची कुठून? एकांत कोठडीत कोंडून ठेवायचे का मुलांना? जगणेच असे नाकारायचे असेल तर मग जन्म द्यायचाच कशासाठी? त्यापेक्षा स्त्रीभ्रूण हत्या काय वाईट? हुंडा – परक्यांचे धन वगैरे कल्पना सोडून द्या.
ज्या पाखराला सुरक्षित आभाळच नाही, त्याला पंख द्यायचेच कशासाठी? ज्या झाडाच्या नशिबी मुक्त वाढच नाही, त्याची बी रुजवायचीच कशासाठी? कुणाला तरी पत्नी हवी म्हणून आम्ही आमच्या पोटच्या गोळ्यांचे बोन्साय जपत बसायचे, हा कुठला न्याय? झालं तेवढं पुरे झालं! यापुढे तरी मुलींच्या सुरक्षेची-स्वातंत्र्याची हमी द्या, अन्यथा स्त्रीभ्रूण हत्येची परवानगी द्या, हीच मागणी असायला हवी!
– सृष्टी गुजराथी
मुक्त पत्रकार, लेखिका खारघर, मुंबई
9867298771