दौंड । स्त्री भ्रूणहत्या व हुंडाबळी प्रथेच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी विद्यार्थिनींनी सक्रीय सहभाग नोंदवणे गरजेचे आहे. मी सातत्याने या विरोधात आवाज उठवत आहे. स्त्रीत्वाचा अपमान करणार्या या प्रथांविरोधात स्त्रीशक्तीचा आवाज बुलंद होणे गरजेचे आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. दौंड शहरातील भेटीदरम्यान त्यांनी दौंड कला व वाणिज्य महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
विद्यार्थिनींनी सुळे यांच्याशी संवाद साधताना त्यांना भेडसावणार्या समस्या निर्भीडपणे मांडल्या. महाविद्यालयात येताना टोळक्याकडून होणार्या टिंगल टवाळीच्या समस्येचादेखील विद्यार्थिनींनी स्पष्टपणे उल्लेख केला. यावर सुप्रिया सुळे यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत अशा टिप्पणी होतात, हे मान्य करून या छेडछाडीबाबत महाविद्यालय प्रशासनाने योग्य दखल घेण्याची सूचना केली. बारामतीप्रमाणे उच्च शिक्षणाची सोय दौंडमध्ये व्हावी, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली. पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सुविधा व शौचालयाच्या सुविधेसाठी खासदार निधीतून शक्य तितकी मदत करण्याचे आश्वासन सुळे यांनी दिले. तसेच तुम्ही स्त्री भ्रूणहत्या व हुंडाबळी प्रथेच्या विरोधात जनजागृती करा, मी स्वतः तुमच्या बरोबरीने सहभाग घेईन, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थिनींना केले. माजी आमदार रमेश थोरात, प्राचार्य जयंत ढेकणे, वैशाली नागवडे, वीरधवल जगदाळे, गुरुमुख नारंग, प्रशांत धनवे व प्राध्यापक याप्रसंगी उपस्थित होते.