स्त्री-जन्माचे स्वागत करणार्‍या डॉक्टर दाम्पत्याचा समाजाला संदेश

0

शिरूर । स्री जन्माचे स्वागत व्हावे हा उदात्त दृष्टीकोन ठेवून येथील डॉ. सतिश व डॉ. अर्चना आंधळे-पाटील दाम्पत्याने गेले दिडवर्षांपासून मुलगी झाल्यास मोफत बाळंतपण करीत आहेत. मुलगी वाचवा हे अभियान त्यांनी सुरू केले असून आत्तापर्यंत तब्बल 140 ते 150 प्रसूती त्यांनी मोफत केल्या आहेत.

140 ते 150 प्रसूती मोफत केल्या
डॉ. आंधळे पाटील दाम्पत्याचे शहरात माऊली हॉस्पिटल असून डॉ. सतिश आंधळे पाटील हे बालरोगतज्ञ तर डॉ. अर्चना आंधळे पाटील या प्रसूतीतज्ञ आहेत. स्री जन्माचे स्वागत व्हावे, हा उदात्त दृष्टीकोण ठेवून त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये मुलगी वाचवा अभियान 12 जून 2016 पासून सुरू केले आहे. गेल्या दिडवर्षात 140 ते 150 प्रसूती मोफत केल्या आहेत. फक्त प्रसुतीच मोफत करत नसून मुलीच्या जन्मापासून पुढील एक वर्ष तपासणीची सेवादेखील मोफत देत आहेत. आमदार बाबुराव पाचर्णे व मुलगी वाचवा अभियानाचे पुरस्कर्ते डॉ. गणेश राख यांच्या उपस्थितीत सुरू केलेल्या या अभियानास सुरूवातीपासून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

इतर डॉक्टरांनीही घेतली प्रेरणा
सामाजिक बांधिलकीतून मुलगी वाचवा अभियानांतर्गत मोफत प्रसूती अव्याहत सुरू ठेवणार असून तालुक्यातील वाड्यावस्त्यांवर व महाविद्यालयांत जाऊन स्रीभ्रूण हत्या करू नका, मुलीच्या जन्माचे स्वागत करा, अशी जनजागृती करत आहेत. तर्डोबाचीवाडी ता. शिरूर येथील भिल्ल वस्ती (समता नगर) दत्तक घेऊन वस्तीवरील जवळपास 150 कुटुंबाना मोफत औषधोपचार करत आहेत. या अभियानातून प्रेरणा घेऊन इतर डॉक्टर मित्रांनीदेखील वेगवेगळ्या प्रकारचे मोफत औषध उपचारांसह शस्रक्रीया अभियान सुरू केले असल्याचे या डॉक्टर दाम्पत्याने सांगितले.

मुलगी झालेल्या पालकांचाही सन्मान
खाजगी रूग्णालयात प्रसुतीसाठी हजारो रूपये शुल्क आकारले जाते. परंतु डॉ. आंधळे पाटील दाम्पत्य नैसर्गिक, सीझरचेदेखील बील घेत नाहीत. मुलगी जन्माला आल्यास त्या बाळाचा रूग्णालयातच स्वागत सोहळा साजरा केला जातो. त्याचबरोबर बाळाच्या पालकांचा पेढे देऊन सन्मान केला जातो. यावेळी मुलगी झालेल्या पालकांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून आपण हे अभियान राबवत असल्याबाबतचे समाधान मिळत असल्याचे डॉ. आंधळे पाटील दाम्पत्याने सांगितले.