खेड प्रथमिक आरोग्य केंद्र येथे भाजपच्या वतिने मातांना फळे वाटप
राजगुरुनगर : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आज खेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज स्त्री जन्माचे स्वागत या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने तालुका भाजपच्या पदाधिकार्यांनी चाकणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आज जन्माला आलेल्या मुलींचे स्वागत करून त्यांच्या मातांना फळे आणि कपडे वाटप करून अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला.
या कार्यक्रमात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास धनवटे, महाराष्ट्र प्रदेश सदस्या संगिता जगताप, खेड तालुका भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा रूपाली पांडे-परदेशी, उपाध्यक्ष मोहिनी राक्षे, अजय जगनाडे, संतोष हजारे, प्रितम शिंदे, जयदीप पाटील, डॉ. श्वेता पाटील आदींनी सहभाग घेतला होता.
सुकन्या समृध्दी योजनेची दिली माहिती
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आज प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलेल्या महिलांना शासन राबवित असलेल्या सुकन्या समृद्धी योजनेची माहिती उपस्थित महिला पदाधिकार्यांनी दिली. तसेच नुकत्याच जन्मलेल्या मुलींचे स्वागत करताना त्यांच्या मातांना खारीक, खोबरं, लाडू आदी वाटप करण्यात आले.चाकण शहरात प्रथमच अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमाचे अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले.