शक्ती ओळखा!

0

स्त्री म्हणजे काय? असे विचारले तर प्रत्येक व्यक्ती आपल्या विचाराने आपल्याला भावते तसे उत्तर देईल. प्रत्येकाची स्थिती ही हत्तीच्या गोष्टीतील आंधळ्यांसारखीच असेल.

स्त्री ही एक शक्ती. कल्पनेच्याही पलीकडचे अशक्य ते शक्य करून दाखवणारी. काळाच्याही पुढे जाऊन आपल्या शारीरिक क्षमतेत बसणार नाही ते सारे काही. पुन्हा हे सारे करून दाखवून कोणाला प्रभावित करायचे असते असेही नाही. मात्र, तरीही अवघ्यांना अचंबित करून टाकणारी अशी एक महाशक्ती.

स्त्री म्हणजे त्याग. अनेकांना नेमके हेच तेवढे लक्षात राहते. त्यामुळे आज त्यावर जास्त चर्चाच नको. पण या त्यागातूनच स्त्री काही गमावत नसतेच उलट एखादी साधी स्त्रीही एखाद्या महाशक्तीची क्षमता मिळवत असते. स्वत:साठी जगणारे तर खूप असतात. नव्हे बहुसंख्य माणसे तशीच असतात. स्त्री मात्र माणसांसारख्या माणूस असूनही फक्त स्वत:साठी न जगता दुसर्‍यांसाठीच जास्त जगताना दिसतात. एखाद्या स्त्रीला गर्दीत बसायला जागा दिली तरी किती मोठा त्याग केला असा आव आणणारे आपण प्रसंगी सर्वस्वाचा त्याग करणार्‍या स्त्रियांच्या त्यागाची कशी बरोबरी करणार? पुन्हा हा त्यागही असा की ज्याचे त्या भांडवलही करत बसत नाहीत तसेच त्यातून गमावण्याच्या दु:खापेक्षा एक वेगळे समाधान मिळवल्याचे भावच जास्त दिसतात. स्त्री हे एक वेगळेच रसायन ते यामुळेही!

उगाचच महिला दिन आहे म्हणून काही आख्यान लावत नाही. पुराणात, इतिहासात नेऊन तुम्हाला स्त्री शक्तीपुढे नतमस्तक व्हायला भागही नाही पाडायचे. मुळात चमत्कार दाखवून नमस्कार करायला लावणे योग्यही नसते. स्त्री काय आहे ते सांगण्यासाठी मुळात तसे काही करण्याची आवश्यकताही नाहीच.

दिवस तसा सर्वांसाठीच 24 तासांचा असतो. मात्र, स्त्रीला पाहिले की कळते. काहींसाठी तो नक्कीच मोठा असावा. भला मोठा. आपण झोपतो तेव्हा झोपताना न दिसणारी ती सकाळी आपण उठण्यापूर्वीच कशी तयार होऊन आपल्यासाठी बाकी तयारी करते, तेव्हा प्रश्‍न नक्कीच पडतो का की ती झोपते तरी कधी? अगदी ती तुमच्यासारखीच रोजगारशील असली, तरीही तिचा आणि तुमचा दिवस सारखाच असतो का? कधीच नसते तसे. घरांचे फ्लॅट झाले. कपडे धुण्याच्या धोक्याच्या जागी वॉशिंगमशीन आली. पाटा-वरंवटा जाऊन मिक्सर-ग्राइंडर आले. आता तर अत्याधुनिक किचन रेंजची चंगळच असते. मात्र, तरीही घरातील सामान बदलत असताना सतत अथक काम करणारी आपली पत्नी तशीच राबत असते. काहीसा आराम वाढला असतोही. मात्र, त्याचवेळी तिने स्वत:ची चार कामे स्वत:हून वाढवलेली असतात. पुन्हा ती वाढवली असतात ते तुमच्यासारखेच ऑफिस सांभाळूनच!

कार्यालयीन काम किमान आठ तास. प्रवासात दोन ते तीन तास. स्वत:च्या दैनंदिन तयारीसाठी किमान एक तास. त्यानंतर कसे गळून जायला होते आपल्यासारख्यांना. त्यानंतर फक्त कल्पना करा. तुम्हाला आणखी चार तास काम करावे लागले. तेही काहीसे कष्टाचे. दुसर्‍या दिवशी कसे मोडून जायला होते. कामाचा मूडच नाही सांगत सिक किंवा आणखी कोणतीतही लिव्ह टाकण्याचा मूड होतोच होतो ना. पण वर्षाचे सर्वच दिवस तसे करूनही स्त्रीला मात्र तसे करताना आपण पाहत नाही. अपवाद वगळता.

त्यात पुन्हा महिलांना कार्यालयीन जगतात…कॉर्पोरेट सेक्टरमध्ये घरी काम करावे लागते म्हणून काही वेगळी वागणूक असते का? शक्यच नसते तसे. तरीही त्या तेथे कामगिरी बजावतात आणि स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करतात. मग का त्यांना सुपरवुमन म्हटले तर आपल्याला त्रास व्हावा. त्यात पुन्हा एखादीने गुणवत्तेच्या बळावर जरी कर्तृत्वाची गगनभरारी घेतली तरी कुजकट गॉसिप करून त्या यशाचे श्रेय भलत्याच गोष्टीला द्यायला आपल्यातीलच काही पांढरपेशे अतिरेकी दबा धरून बसलेलेच असतात!

मघाशी कामाचा ताण वाढल्याने मूड बिघडल्याने आपण काय करतो ते सांगितले. स्त्रियांचा मूड बिघडावा असे बरेच काही घडत असते. आपण जर संवेदनशील असलो तर आपल्यालाही ते बोचत असतेच. साधे प्रवासातील गर्दीत गैरफायदा घेण्यासाठी टपलेली वखवखलेली श्‍वापदे काही कमी नसतात. नको तेथे नको तसा ओंगळवाणा स्पर्श झाल्यावर कसा मूड बिघडत असेल त्याची फक्त कल्पना करून पाहा तसेच आपल्याकडच्या स्वच्छतागृहांची अवस्था. खरेतर त्यांना अस्वच्छतागृहेच म्हटले पाहिजे. एकतर नसतातच किंवा असली तर बहुतांश अस्वच्छच. काही तासांच्या प्रवासात तहान लागूनही पाणी न पिणे, साध्या निसर्गभावनांना आवर घालणे सोपे नसते. पण ते जसे स्त्रीला करावे लागते. ते पुरुषांना नाही करावे लागत.

अर्थात स्त्रिया म्हणजे अगदी शंभर टक्के महानच असेही नाही. काहींचे चुकतेही. माणुसकीची हद्द पार करण्याइतपत वागणार्‍या पुरुषांप्रमाणेच काही स्त्रियाही असतात. तशांना स्त्रियांनीच भानावर आणले पाहिजे असे वाटते. तशांमुळे शक्तीचा विध्वंसक गैरवापरच लोकांच्या मनात काळीकुट्ट प्रतिमा रंगवतो. ते योग्य नाही. शेवटी अणुशक्तीने जीवन घडवणारी अणुऊर्जा तयार होत असली, तरी त्याच अणुशक्तीमुळे जीवन संपवणारे अणुबॉम्बही तयार होतात. गरज असते ती शक्तीला समजून घेऊन सकारात्मक वापराची. शक्तीवर शक्तीचेच नियंत्रण योग्य.

मात्र, तशी विध्वंसक शक्ती कमीच! त्यामुळेच आपण प्रत्येकाने आपल्या सभोवतालच्या शक्तीला समजून घेतलेच पाहिजे. मग ती घरात असो वा कार्यालयात. प्रचिती येत असते. मात्र, थोरवी उमगत नसते. डोळे उघडे असले, तरी डोके बंद असते. गरज ते उघडण्याची आहे.