डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अॅन्ड एज्युकेशन ट्रस्टतर्फे आदर्श माता पुरस्कार वितरण
पुणे : आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री अग्ररेस आहेच, त्याच बरोबर स्वत:चे घर त्या सक्षमपणे सांभाळताना दिसतात. नवरा गेल्यानंतर स्त्री स्वत: वडील होऊन त्यांना मोठे करून, त्यांचे शिक्षण पूर्ण करते. स्त्री ही घराबरोबरच समाजाचे सर्वात मोठे पाठबळ आहे. येणार्या काळात स्त्रियांशिवाय देश महासत्ता होऊ शकत नाही. समाजाचा हा गाडा पुढे नेण्याची जबाबदारी महिलांवर आहे. परंतु सध्या समाजात स्त्रियांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न आहे, त्यामुळे स्त्रियांनी स्वत:ची काळजी घ्यायला हवी, असा प्रेमळ सल्ला माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांनी दिला.
डॉ. सुधाकरराव जाधवर सोशल अॅन्ड एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने पहिला आदर्श माता पुरस्कार कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मातोश्री रत्नाबाई खोत आणि एमआयटीचे राहुल कराड यांच्या मातोश्री उर्मिला कराड यांना प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार संगीता ठोंबरे, नगरसेविका नीता दांगट, राजाभाऊ लायगुडे, प्राचार्य डॉ सुधाकरराव जाधवर, अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होते. शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते.
जिजाऊचा आदर्श समोर ठेवावा
आमदार ठोंबरे म्हणाल्या की , जिजामातांनी शिवरायांना घडवायचे ठरविले आणि एक महान युगपुरूष देशाला मिळाला. तसे प्रत्येक महिलेने जिजाऊचा आदर्श समोर ठेवून आपल्या मुलांना घडविले पाहिजे, तर उद्याची पिढी संस्कारक्षम घडेल. आजची पिढी देखील देशावर प्रेम करणारी पिढी आहे. आदर्श भारत युवापिढीच घडवू शकते, त्यामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार घडणे महत्वाचे आहेत.
पुरस्काराला उत्तर देताना उर्मिला कराड म्हणाल्या, मी आदर्श माता आहे का हे माहिती नाही. परंतु मी माझ्या मुलांची चांगली आई आहे, हे मला माहिती आहे. अनेक मुलांनी मला आई म्हणून संबोधले आणि मी देखील त्यांनी आई म्हणून आर्शिवाद दिला आहे, हीच माझी खरी संपत्ती आहे.
यशाचे शिखर गाठू शकते
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, लहानपणापासून केलेले संस्कार, योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन यामुळे प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठू शकतो. मात्र, त्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे त्यांच्या आईचे अमूल्य योगदान असते. त्यामुळे समाजातील अशाच यशस्वी व्यक्तींच्या मातांचा सन्मान संस्थेतर्फे केला गेला. पुरस्काराचे यंदा पहिले वर्ष असून संस्थेच्या सुरेखा सुधाकरराव जाधवर यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी शिक्षणसंस्थेतील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या ‘आई’ या विषयावरील निबंधाच्या संग्रहित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.