जळगाव । शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या शिवाजी रोड, सुभाष चौक व बळीराम पेठेतील हॉकर्सचे ख्वॉजामियाँ झोपडपट्टीच्या जागेवर स्थलांतरीत करण्याची कारवाई सोमवारी करण्यात आली. स्थलांतराच्या जागी न गेलेल्या हॉकर्सला हटविण्यास सुरुवात करताच अतिक्रमण पथक व हॉकर्सदरम्यान वाद सुरू झाला. सुभाष चौकात सकाळी साडेदहा वाजता बाचाबाची होवून पळापळ झाली. याप्रकरणी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी हॉकर्सची बाजू घेत त्यांना जुन्या सानेगुरुजी रुग्णालयाच्या जागेवर व्यवसाय करुन देण्याची भूमिका व्यक्त केली आहे.
आज सोमवारी महापालिकेने हॉकर्सला ख्वाजॉमियॉ चौकातील जागेत स्थलांतरीत होण्याचे आवाहन केले होते. मात्र, हॉकर्सने त्यास प्रतिसाद न देता विरोधाची भूमिका घेतली. सकाळी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक बळीराम पेठ व सुभाष चौकात भागात गेल्यावर मूळ ठिकाणीच अनेक हॉकर्सने आपली दुकाने थाटली होती. मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक पोलिस बंदोबस्तासह सकाळी 11 वाजेच्या सुमारास बळीराम पेठ भागात पोहचल्यानंतर ज्या विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती त्यांनी पळापळ सुरू केली. पथकाने पळून जाण्याच्या बेतात असलेल्या विक्रेत्यांचा माल जप्त करण्याचा प्रयत्न केला. यावरून अतिक्रमण पथक व विक्रेत्यांमध्ये शाब्दिक वाद झाले. काही विक्रेत्यांनी यावेळी अतिक्रमण पथकातील कर्मचार्यांकडून साहीत्य परत घेण्याचा प्रयत्न केले.
सुभाष चौकात देखिल अतिक्रमण पथक येताच हॉकर्सनी हातगाड्या व माल घेवून पळण्यास सुरुवात केली. यावेळी अतिक्रमण विभागाच्या पथकाने पाच ते सहा हातगाड्या जप्त केल्यात. हातगाडय माल जप्त करणार्या कर्मचार्यांकडून तो ओढण्याचा प्रयत्न विक्रेत्यांनी केला. साहीत्याच्या या ओढाओढीत अतिक्रमण कर्मचारी व विक्रेत्यांमध्ये बाचाबाची झाली.