पुणे । जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष मतदार नावनोंदणी दरम्यान मतदारांची छायाचित्रे गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी जाऊन भेटी दिल्या. या भेटी दरम्यान अनेक मतदार दिलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील लाखो मतदार यादीत नमूद केलेल्या पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे 28 ऑगस्टपर्यंत संभाव्य यादीतील जे मतदार अथवा संबंधित व्यक्ती पुराव्यासह हजर राहणार नाहीत, अशा स्थलांतरित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे निवडणूक अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
या मोहिमेदरम्यान एकट्या शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात 33 हजार 839 जण मतदार यादीतील नमूद पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून आले आहेत. शिवाजीनगर मतदार संघातील स्थलांतरित मतदारांची यादी 12 ऑगस्ट रोजी राबविण्यात येणार्या विशेष मोहिमेच्या वेळी सर्व मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
छायाचित्र जमा करा
जिल्ह्यात ही संख्या लाखोंच्या घरात आहे. ज्या मतदारांनी आपले छायाचित्र संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा केले नाही, त्यांनी तत्काळ आपले छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांकडे जमा करावे. मयत मतदार असल्यास त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र मतदाराच्या नातेवाईकांनी सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.