पुणे : 91 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हे हिवरा आश्रम येथे घेण्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा काहीही विरोध नाही. ज्यांना वादग्रस्त ठरविण्यात आले होते ते शुकदास महाराज आता हयात नाहीत, त्यामुळे साहित्य संमेलनाच्या जागेबाबत आक्षेप नोंदविण्याची काहीच गरज नाही, असे सडेतोड मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष मिलिंद देशमुख यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मंगळवारी व्यक्त केले. तर हिवरा आश्रम येथील साहित्य संमेलन निर्विघ्न पार पडावे, सारस्वतांची सेवा करण्याची संधी बुलडाणा जिल्ह्याला हवी होती, ती मिळाली आहे. ती सार्थकी लावणे हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन विवेकानंद आश्रमाचे मुख्य प्रवक्ते व सचिव संतोष गोरे यांनी दूरध्वनीवरून दैनिक जनशक्तिशी बोलताना केले.
साहित्य संमेलनाबाबत अंनिसला हरकत नाही!
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 91 वे साहित्य संमेलन बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे विवेकानंद आश्रमाच्या प्रांगणात होऊ घातले आहे. या आश्रमाची स्थापना संत शुकदास महाराज यांनी केली असून, महाराजांवर श्याम मानव यांच्या नेतृत्वातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीने टीका केली आहे. तसेच, हे संमेलन शुकदास महाराजांच्या आश्रमात घेण्यास विरोध दर्शविला आहे. याबाबत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. समितीचे राज्य कार्याध्यक्ष मिलिंद देशमुख म्हणाले, की बुलडाण्यातील साहित्य संमेलनात जागेवरून नव्हे तर विचारावरून वाद व्हायला हवा. शेवटी आपल्या सर्वांची ही विवेकाची लढाई आहे. स्थळाबाबत अद्याप अंनिसने आपली भूमिका जाहीर केलेली नाही. तरीही यापूर्वी हिवरा आश्रम येथे प्रबोधनाचे कार्यक्रम झालेले आहेत. तेव्हा, या स्थळाचा वैज्ञानिक दृष्टिकोनासह चांगल्या कामासाठी वापर होत असेल तर या ठिकाणी साहित्य संमेलन घेण्यास अंनिसला काहीच हरकत नाही. तथापि, शुकदास महाराजांचे छायाचित्र संमेलनाच्या व्यासपीठावर नको, अशी आमची भूमिका आहे, असेही देशमुख म्हणाले.
आम्ही सर्वांशी संवाद साधण्यास तयार : गोरे
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर हे नेहमीच विवेकाची लढाई लढले. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर पूज्यनीय शुकदास महाराजांचे छायाचित्र असावे किंवा नसावे, याबाबत अद्याप काहीही बोलणी झालेली नाही. अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष मिलिंद देशमुख यांच्याशी या संदर्भात सविस्तर चर्चा केली जाईल, त्यांची भूमिकाही समजून घेतली जाईल. संवाद हा समस्या सोडविण्याचा सर्वोत्तम मार्ग असतो. हिवरा आश्रम येथील साहित्य संमेलन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आम्ही सर्वांशी संवाद साधण्यास तयार आहोत, अशी माहिती संमेलन आयोजक विवेकानंद आश्रमाचे मुख्य प्रवक्ते व सचिव संतोष गोरे यांनी दैनिक जनशक्तिशी बोलताना दिली.