स्थानबद्धत्तेची शिक्षा भोगून आल्यानंतर केला पुन्हा गुन्हा : भुसावळात कुविख्यात तस्लीम काल्या कट्ट्यासह जाळ्यात

भुसावळ : बाजारपेठ पोलिसांच्या रेकार्डवरील कुविख्यात गुन्हेगार तस्लीम सलीम शेख उर्फ तस्लीम काल्या (26, दिनदयाल नगर, भुसावळ) यास गावठी कट्ट्यासह बाजारपेठ पोलिसांनी रविवारी रात्री सव्वा वाजेच्या सुमारास अटक केली आहे. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वीच आरोपी वर्षभर स्थानबद्धतेची (एमपीडीए) शिक्षा भोगून भुसावळात परतला मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी स्वस्थ बसू देत नसल्याने आरोपीने चाकूच्या धाकावर दहशत निर्माण करीत बांधकाम करणार्‍या मजुराला चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील दोन हजारांची रोकड रविवारी दुपारी 1.40 वाजेच्या सुमारास हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

गावठी कट्ट्यासह आरोपी जाळ्यात
आरोपी तस्लीम काल्याविरोधात लुटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांचे गुन्हे शोख पथक आरोपीचा शोध घेत असताना आरोपी नगरपरीषदेच्या बहुउद्देशीय हॉलजवळ लपून असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने धाव घेत आरोपीला रविवारी रात्री 10.10 वाजेच्या सुमारास अटक केली. आरोपीच्या अंगझडतीत त्याच्या डाव्या पँटच्या खिशातून 15 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला. ही कारवाई बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय शरीफ काझी, पोलिस हवालदार विजय नेरकर, नाईक निलेश बाबूलाल चौधरी, नाईक उमाकांत पाटील, नाईक तेजस परीसकर, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल प्रशांत सोनार, कॉन्स्टेबल योगेश माळी, कॉन्स्टेबल सचिन पोळ, कॉन्स्टेबल जावेद शहा, कॉन्स्टेबल सचिन चौधरी आदींच्या पथकाने केली.

चाकूहल्ल्यात तस्लीम काल्या जखमी
बाजारपेठ पोलिसांनी आरोपी तस्लीम काल्याला अटक केली तेव्हा त्याच्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसल्याने याबाबत त्यास विचारणा केली असता त्याने सांगितले की, थोड्याच वेळेपूर्वी त्याचे कडू सोनार याच्याशी भांडण झाले व भांडणात कडू सोनारने त्याच्या पाठीमागील बरगडीवर उजव्या बाजूला चाकूने हल्ला करून जखमी केल्याची कबुली दिली.

पैसे दे नही तो मर्डर कर डालूंगा : लूट प्रकरणी गुन्हा
आरोपी तस्लीम काल्याने याने रविवारी दुपारी 1.40 वाजेच्या शहरातील कालंका माता मंदिराजवळ सुमारास आकाश प्रकाश थोरात (30, दिनदयाल नगर, अशोक नगर, भुसावळ) या हातमजुरास अडवून 50 रुपये पुडी खाण्यासाठी मागितले व ते नही दिल्याने मेरे को जानता नही क्या, पैसे दे नही तो मर्डर कर डालूंगा, असे म्हणत मैं तस्लीम काल्या हू, असे म्हणत चाकू काढून दहशत निर्माण केली व खिशातील मजुरीचे आलेले दोन हजार रुपये हिसकावून घेतले व लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकारानंतर घाबरलेल्या तक्रारदाराने बाजारपेठ पोलिस ठाणे गाठून पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्याकडे कैफियत मांडली व नंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, तस्लीम काल्या हा कुविख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरोधात खंडणी, हाणामारी, जबरी लूटसह अन्य प्रकारचे दहा ते बारा गुन्हे बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल आहेत.