मुंबई : मुंबईत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन प्रवेशांचा प्रश्न गंभीर असून तो सोडविला नाही, तर विद्यार्थी शिक्षणाच्या बाबतीत उदासीन होतील अशी भीती भाजप आमदार राज पुरोहित यांनी व्यक्त करीत शिक्षण खात्याला या संदर्भातील निवेदन दिले आहे. अधिकारी व महाविद्यालयांचे प्राचार्य आमदारांना किंमत देत नाहीत हे लक्षात घेऊन आणि स्थानिक विद्यार्थ्यांचा प्रवासाचा वेळ व पैसा वाचविण्यासाठी स्थानिक विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये २५ टक्के कोटा राखीव ठेवण्याची मागणी पुरोहित यांनी केली आहे.
मुंबईतील महाविद्यालयीन प्रवेशाच्या प्रश्नाबाबत पुरोहित यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सद्ध्या हा प्रश्न चिघळला असून निराश झालेले पालक व विद्यार्थी आमदारांकडे हेलपाटे मारत आहेत. शिक्षण उपसंचालक व संचालक हे आमदारांशी नीट बोलतही नाहीत व दूरध्वनीही उचलत नाहीत. त्यामुळे ते विद्यार्थ्यांना काय न्याय देणार, असा सवाल करीत पुरोहित म्हणाले, ऑनलाइन प्रक्रियेमुळे दक्षिण मुंबईतील विद्यार्थ्यांना मालाड, बोरिवलीच्या महाविद्यालयात प्रवेश दिला जात आहे. गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना हा खर्च परवडणारा नाही. मुलींच्या पालकांना सुरक्षिततेच्या दृष्टीनेही अडचण वाटत आहे. आपल्या घराजवळ महाविद्यालय असताना उपनगरातील महाविद्यालयात प्रवेश दिला जाणे हे चुकीचे असून ऑफ लाइन प्रवेश हा भ्रष्टाचाराचा मार्ग आहे आणि लाखो रुपये उकळले जात आहेत, असा आरोपही पुरोहित यांनी केला.
अशा वेळी महाविद्यालयांचे प्राचार्य आमदारांच्या शिफारसपत्रांना कचऱ्याच्या टोपलीत फेकत आहेत. त्यामुळे आमदारांच्या प्रतिष्ठेचे रक्षण केले जावे, अशी मागणी पुरोहित यांनी केली आणि शासनाला घरचा आहेर दिला आहे. यावर उपाय म्हणून ५ ते १० किमी अंतराच्य परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखून ठेवाव्यात अशी मागणी त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. प्रवेश प्राथमिकता यादी महाविद्यालयांना आपल्या नोटीस बोर्डवर लावावी आणी विशेषतः विद्यार्थिनीची गैरसोय टाळली जावी असे मत त्यांनी मांडले. फक्त मुंबईतील नाही तर राज्यातील प्रवेशाचा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण विभागाने हे पाउल उचलावे अशी मागणी राज पुरोहित यांनी केली. या मागणीसाठी ४ जुलै रोजी ते धरणे विद्यार्थी पालक संघटनासोबत धरणे आंदोलन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.