महेश लांडगे : भारतीय जनता माथाडी शाखेचे उद्घाटन
रांजणगाव । रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यांच्या माध्यमातून स्थानिक कामगार आणि उद्योजक-व्यावसायिकांना बळ देण्याचे काम भाजपच्या वतीने करण्यात येणार आहे. तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहतीमधील एकाच पक्षाची मक्तेदारी मोडीत काढण्याचा इशारा आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहतीत भारतीय जनता माथाडी जनरल कामगार आघाडी शाखेचे उद्घाटन लांडगे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कामगारांच्या हक्काचा पैसा कामगारांना मिळण्यासाठी भाजप सरकार प्रयत्नशील राहणार आहे. याआधी ही पैसा काही नेत्यांकडून आणि पक्षांकडून राजकारणासाठी वापरला जात होता. यापुढे असे होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी भाजप आग्रही राहणार असल्याचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी यावेळी नमूद केले. भारतीय जनता माथाडी कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भोंडवे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष विशाल लायगुडे, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान शेळके, रोहिदास उंद्रे, अॅड धमेंद्र खांडरे आदींसह विविध मान्यवर आणि कामगार वर्ग मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होता. भाजपचे तालुका सरचिटणीस गोरक्ष काळे यांनी सुत्रसंचलन केले. तर, आभार नितीन पाचर्णे यांनी मानले.