स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधींसाठी आता प्रशिक्षण संस्था

0

मुंबई । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून येणार्‍या प्रतिनिधींसाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण संस्था स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीतून निर्णय प्रक्रियेतील विकेंद्रीकरण यशस्वी होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. राज्य निवडणूक आयोग, शासनाचा ग्रामविकास विभाग, मुंबई विद्यापीठ आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटीकल अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स, पुणे यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या समारोपात मुख्यमंत्री बोलत होते. 73 व 74 व्या घटना दुरुस्तीच्या रौप्य महोत्सवानिमित्त या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

घटना दुरुस्तीमुळे मिळाली स्वराज्य संस्थांना बळकटी
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या महत्वपूर्ण घटना दुरुस्तीच्या रौप्य महोत्सवानिमित्त महाराष्ट्रात अशा प्रकारे पहिली राष्ट्रीय परिषद आयोजन हे औचित्यपूर्ण आणि अभिमानास्पद आहे. या सिंहावलोकनातून पुढील काळातील वाटचालीचा मार्ग निश्‍चित करता येतो. या घटना दुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या बळकटी करण्याचा पाया घातला गेला. अशी एक-एक संस्था बळकट होण्यातून लोकशाहीची प्रगतिशिलता सिद्ध होते. स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्थान लोकशाहीत निश्‍चितच अन्य संसदीय संस्थांप्रमाणेच महत्वाचे आहे. या घटना दुरुस्तीमुळे ही बाबच अधोरेखित झाली आहे.

विविध प्रश्‍नांचा आढावा
निवडणूक आयुक्त सहारिया यांनी यावेळी महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत निवडणूक आयोगाने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याचे नमूद केले. तसेच मुक्त आणि निर्भय वातावरणात या निवडणुका यशस्वीपणे पार पडल्याचे ही नमूद केले. डॉ. मानसी फडके आणि डॉ. मृदुल निळे यांनी या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत विविध तज्ज्ञांनी केलेल्या मांडणीचा आढावाही सादर केला. समारंभात मुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते संस्थांनी सर्वेक्षणाद्वारे तयार केलेल्या अहवालांच्या पुस्तिकांचेही प्रकाशन केले