‘स्थायी’चे अध्यक्षपद राहुल जाधवांसाठी अडथळ्यांची शर्यत!

0

अध्यक्षपदासाठी भाजपअंतर्गतच्या तीनही गटांमध्ये जोरदार चुरस

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षांतर्गतच्या तीनही गटांमध्ये जोरदार चुरस निर्माण झालेली आहे. यापूर्वीचे अध्यक्षपद हे आ. लक्ष्मण जगताप यांच्या गटाकडे होते, त्यामुळे यावेळेस हे पद हे आ. महेश लांडगे गटाला जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र आ. लांडगेंनी या पदासाठी राहुल जाधव यांना पसंती दिली असताना, त्यांच्यापुढे अध्यक्षपदासाठीची अडथळ्यांची शर्यत पार करण्याचे मोठे आव्हान आहे. आ. लांडगे गटाला हे पद दिले तर त्यांचा महापौर असू नये, असा अनेकांनी सूर लावल्याने हे पद कोणाला जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, महापौरपद आ. लांडगे गटाला तर स्थायीचे अध्यक्षपद आ. जगताप गटाला देण्याचे सूत्र यापूर्वीच निश्चित झालेले आहे. त्यामुळे या पदावर आ. जगताप गटानेच दावा ठोकलेला आहे.

रिक्त जागांसाठी अनेकांची जोरदार फिल्डिंग
महापालिकेच्या तिजोरीची किल्ली म्हणून स्थायी समितीची ओळख आहे. या समितीमध्ये जाण्यासाठी अनेकांमध्ये स्पर्धा आहे. राष्ट्रवादीमध्ये दोन जागांसाठी 21 जण इच्छुक आहेत. तर भाजपमध्ये सहा जागांसाठी जवळपास पन्नास ते साठ नगरसेवक इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींना जाऊन भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यासोबतच आमची शिफारस आमदारांकडे करा असे आमदारांच्या निकटवर्तींयांनाही सांगितले आहे. त्यामुळे येणारे नवीन सदस्य हे कोण असतील हे वेळीच समजणार आहे. शिवाय, हा वाद सद्या मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला असल्याचेही सांगण्यात येत आहे. महापालिकेवर भाजपची सत्ता येताच स्थायीचे अध्यक्षपद हे आ. लक्ष्मण जगताप यांच्या गटाच्या सीमा सावळे यांना देण्यात आले होते. मात्र त्या राहण्यासाठी भोसरी मतदारसंघात असल्यामुळे हे पद भोसरीला मिळाल्याचे बोलले जात होते. त्यातून आता चिंचवडला हे पद मिळावे असा वाद निर्माण केला गेला आहे. सावळे या जगताप गटाच्या कट्टर समर्थक असल्याने जगताप गटाचा स्थायीचा कोटा पूर्ण झाला आहे. आता महापौर हा जगताप गटांचा आणि स्थायीचा सभापती हा लांडगे गटाचा असा सूर निघत आहे.

राहुल जाधव की शीतल शिंदे?
महापौर बदलाच्या भाजपात काहीच हालचाली नसून, स्थायी समितीचे अध्यक्षपद कोणाला द्यावे, हाच गंभीर मुद्दा बनलेला आहे. हे पद भोसरीला दिल्यास एकाचवेळी लांडगे गटाचे दोन महत्वपूर्ण शिलेदार महापालिकेत असतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे स्थायीचे अध्यक्षपद भोसरीला दिले तर महापौरांचा कालावधी संपुष्टात आणून हे पद चिंचवडला देण्यात यावे, अशी मागणीदेखील भाजपातून पुढे आली आहे. त्यामुळे स्थायीचे अध्यक्षपद मिळविताना या पदासाठी सर्वात पुढे असलेले आ. लांडगे गटाचे नगरसेवक राहुल जाधव यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे. तूर्त तरी या पदासाठी पिंपरी-चिंचवडमधून शीतल शिंदे इच्छुक आहेत. यापूर्वी शिंदे यांना विधी समितीमध्ये पद देण्याचे जाहीर केले गेले होते. मात्र त्यांनी त्यावेळी कुठलेही पद घेतले नाही. त्यामुळे त्यांनाही चांगले पद मिळण्याची अपेक्षा असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.