‘स्थायी’चे मतदान गुप्तपद्धतीने घ्या!

0

भाजपमधील दुफळीचा फायदा घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न
पुण्याच्या विभागीय आयुक्तांना मोरेश्वर भोंडवेंनी दिले पत्र

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदावरून भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. याचा फायदा घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न सुरु केला आहे. या पदासाठी निवडणूक गुप्त मतदानाने घेण्याची मागणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे केली आहे. सात मार्चला स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक होणार आहे. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांना निवेदन देऊन गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात यावी, अशी मागणी भोंडवे यांनी केली आहे. अशा प्रकारे मतदान घेतले गेल्यास कुणी कुणाला मतदान केले हे कळणार नाही. त्यामुळे पक्षादेशाचे उल्लंघन झाले तरी, पक्ष कुणाला निलंबित करू शकणार नाही.

राजीनामा मागे घेण्यासाठी महापौरांवर दबाव
स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती. या पदासाठी निष्ठावान विलास मडिगेरी, शीतल शिंदे आणि राहुल जाधव यांच्यात तीव्र स्पर्धा निर्माण झाली होती. त्यांच्यापैंकी एकाची अध्यक्षपदासाठी विचार केला जाईल असे बोलले जात होते. परंतु, अर्ज दाखल करण्याच्या काही वेळ अगोदर अचानक सूत्रे हलली आणि चिंचवड मतदारसंघातून प्रथमच निवडून आलेल्या ममता गायकवाड यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे आले. त्यांचा भाजपतर्फे अर्ज भरण्यात आला. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांचे समर्थक आक्रमक झाले. त्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामे दिले आहेत. महापौर नितीन काळजे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे सुपूर्त केला आहे. तो मागे घेण्यात यावा यासाठी, त्यांच्यावर प्रचंड दबाव निर्माण केला जात आहे.

भाजपच्या गोटात अस्वस्थता
भाजपमधील नाराजीचा फायदा उठविण्यासाठी चार सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्थायी समितीच्या निवडणुकीत उडी घेतली असून, मोरेश्वर भोंडवे यांना रिंगणात उतरविले आहे. भोंडवे यांना स्थायीत एक सदस्य असलेल्या शिवसेनेने पाठिंबा दर्शविला आहे. तसेच भाजपच्या असंतुष्टांवर गळ टाकण्याचा भोंडवे यांचा प्रयत्न आहे. ही निवडणूक हातवर करुन घेतली जाते. भाजपच्या फुटीचा फायदा घेण्यासाठी भोंडवे यांनी ही निवडणूक गुप्त पद्धतीने घेण्याची मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे भाजपचा गोटात अस्वस्था पसरली आहे. ही निवडणुक सात मार्चला होणार आहे.