‘स्थायी‘च्या अध्यक्षपदी सीमा सावळे बिनविरोध

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांची शुक्रवारी अपक्षेप्रमाणे बिनविरोध निवड करण्यात आली. साखर आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी खासदार गजानन बाबर, माजी महापौर आझम पानसरे, शकुंतला धराडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी नगरसेवक शंकर जगताप, भाजप उपाध्यक्ष सदाशीव खाडे आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपतर्फे सीमा सावळे यांचा एकमेव अर्ज भरला गेल्यामुळे स्थायी समितीवर सावळे यांची बिनविरोध निवड झाली. संख्याबळ जास्त नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज भरला नव्हता. सावळे या स्थायी समितीच्या 33 व्या अध्यक्षा आहेत. तसेच त्या पहिल्या मागासवर्गीय महिला अध्यक्षा ठरल्या आहेत. निवडीनंतर सावळे यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.

भाजपने राष्ट्रवादीची परंपरा मोडली!
महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपकडून स्थायी समिती अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. महापालिकेत राष्ट्रवादी विरोधी पक्ष असून, पुरेशा संख्याबळाअभावी राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही. अध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. साखर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. अध्यक्षपदासाठी सावळे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे शर्मा यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. आतापर्यंत महापालिकेत सत्तेत राहिलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकाही मागासवर्गीय महिलेला स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले नव्हते. परंतु, भारतीय जनता पक्षाने ही परंपरा मोडीत काढून सत्तेत आल्यानंतर स्थायीच्या पहिल्याच वर्षी एका मागासवर्गीय महिलेला संधी दिली. निवडीनंतर सर्वपक्षीय नगरसेवक व अनेक मान्यवरांनी स्थायी समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सीमा सावळे यांचे अभिनंदन केले.