पिंपरी । पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समतीचे सभापती विलास मडिगेरी यांच्यासह भाजप आणि राष्ट्रवादीचे आठ सदस्य स्थायीतून बाहेर पडणार आहेत. त्यांच्याजागी नवीन सदस्यांची निवड होणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादीच्या इच्छुक नवीन सदस्यांना स्थायीमध्ये संधी दिली जाणार आहे. मात्र, ही संधी कोणाला मिळणार आणि सभापती पदासाठी भाजपमधील कोण शड्डू ठोकणार, हे येत्या काही दिवसांतच समोर येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समतीचा एक वर्षाचा कार्यकाळ येत्या 19 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यासोबतच दोन वर्ष सदस्य राहिलेल्या आठ सदस्यांना स्थायी समितीतून बाहेर पडावे लागणार आहे. त्यामध्ये स्थायीचे सभापती विलास मडिगेरी, सदस्य राजेंद्र गावडे, सागर आंगोळकर, ममता गायकवाड, करुणा चिंचवडे, नम्रता लोंढे, गीता मंचरकर, प्रज्ञा खानोलकर या आठ सदस्यांचा समावेश आहे. या सदस्यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ 19 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नवीन सदस्यांना संधी मिळणार आहे.