पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक चाव्या असलेल्या स्थायी समितीमध्ये रिक्त झालेल्या दोन जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 36 नगरसेवकांपैकी तब्बल 16 जण इच्छूक आहेत. दोन माजी महापौर, दोन माजी विरोधी पक्षनेते यांनी अर्ज केला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यामधून कोणत्या दोघांची निवड करतात. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. स्थायी समितीचे राष्ट्रवादीचे मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ 28 फेब्रुवारीला संपणार आहे. भाजपाच्या पाच आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाची देखील मुदत संपणार आहे. राष्ट्रवादीने स्थायी समिती सदस्यपदासाठी इच्छूकांडून अर्ज मागविले होते. नवीन आठ सदस्यांची आज बुधवारी 20 रोजी होणा-या महासभेत निवड केली जाणार आहे.
राष्ट्रवादीकडून दोन जागांसाठी माजी महापौर वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, स्वाती काटे, विनया तापकीर, पौर्णिमा सोनवणे, संगीता ताम्हाणे, माजी विरोधी पक्षनेते शाम लांडे, विनोद नढे, जावेद शेख, राजू बनसोडे, रोहित काटे, संतोष कोकणे, मयूर कलाटे, समीर मासुळकर, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर यांचा समावेश आहे. दरम्यान, स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीच्या दोन महिला नगरसेविका आहेत. दोन पुरुष नगरसेवक समितीतून बाहेर पडत आहेत. त्यामुळे दोन पुरुष नगरसेवकांना स्थायीचे सदस्यत्व दिले जाण्याची शक्यता आहे. यामधून कोणत्या दोन सदस्यांना राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार संधी देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.