पुणे महापालिकेच्या सभापतीप्रमाणेच पिंपरीच्या सभापतींनाही चिठ्ठीचा दणका
पिंपरी-चिंचवड (मनिषा थोरात) : महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांचा बुधवारी ड्रॉ घेण्यात आला असता, त्यामध्ये सभापती सीमा सावळे यांच्यासह आठ सदस्यांना स्थायीतून बाहेर पडावे लागले आहे. त्यामुळे उर्वरित सदस्यांची धाकधूक संपली आहे. पुणे महापालिकेच्या सभापतींनादेखील चिठ्ठीनेच क्लीनबोल्ड केले होते. अगदी तसेच पिंपरी-चिंचवड स्थायीच्या सभापती सीमा सावळे यांनाही चिठ्ठीनेच क्लीनबोल्ड केले. त्यांच्या सभापतीपदाचा कार्यकाळ वर्षभरातच संपुष्टात आला आहे. त्यांच्यासोबतच कुंदन गायकवाड, उषा मुंडे, कोमल मेवानी, हर्षल ढोरे, आशाताई शेंडगे हे भाजपचे सदस्य तर अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य ड्रॉमध्ये स्थायी समितीतून बाहेर पडले आहेत.
भोंडवे, मिसाळ, गावडे, बारणे ठरले लकी!
मधुकर पवळे सभागृहामध्ये ड्रॉची सोडत झाली. त्यामध्ये स्थायी समितीतील सोळा सदस्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढून त्या चेंडूत घालून ड्रॉमध्ये टाकण्यात आल्या. त्यानंतर आठ नावांच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यामध्ये समितीच्या विद्यमान सभापती सीमा सावळे, त्यांच्या सोबतच सदस्य कुंदन गायकवाड, उषा मुंडे, कोमल मेवानी, हर्षल ढोरे, आशा शेंडगे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर यांना स्थायी समितीतून बाहेर पडावे लागले आहे. तर स्थायीमध्ये राहिलेल्या नगरसेवकांमध्ये प्रा. उत्तम केंदळे, लक्ष्मण उंडे, माधुरी उर्फे मोना कुलकर्णी, निर्मला कुटे हे भाजपचे सदस्य तर राष्ट्रवादीचे मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, शिवसेनेचे अमित गावडे आणि अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांना हा ड्रॉ शुभ ठरला आहे.
सर्वसाधारण सभेत नवीन सदस्यांची नियुक्ती
स्थायी समितीमध्ये एकूण 16 सदस्य आहेत. त्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. चिठ्ठी काढून ती नावे निश्चित केली जातात. त्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. फेब्रुवारीमध्ये पार पडणार्या सर्वसाधारण सभेत नवीन आठ सदस्यांची नावे नियुक्त होणार आहेत. त्यानंतर या सदस्यांना 1 मार्चपासून कामकाज करता येणार आहे. दरम्यान, स्थायी समितीमध्ये आपली वर्णी लागावी यासाठी आत्तापासूनच नगरसेवकांनी आपल्या वरिष्ठांकडे जोरदार ’फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे. ज्या पक्षाचे जेवढे सदस्य बाहेर पडलेत तेवढेच पुन्हा नव्याने स्थायीत घेतले जाणार आहेत. त्यांची घोषणा या महिन्याच्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे.
हे आहेत ’लकी’ नगरसेवक
लक्ष्मण उंडे, प्रा. उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे (भाजप), राष्ट्रवादीचे मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, शिवसेनेचे अमित गावडे आणि अपक्षांचे गटनेते कैलास बारणे
* हे आहेत ‘अनलकी’ नगरसेवक
सीमा सावळे, कुंदन गायकवाड, उषा मुंडे, हर्षल ढोरे, आशा शेंडगे, कोमल मेवाणी (भाजप), राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर