स्थायीतील ठरावाची अंमलबजावणी दोन आठवड्यात करा

0

स्थायी समितीच्या प्रशासनाला सूचना

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये विविध विषयांचे ठराव केले जातात. आतापर्यंत अनेक विभागाशी संलग्न असे ठराव करण्यात आले आहे, मात्र त्याची अंमलबजावणी आतापर्यंत केली जात नव्हती. त्यामुळे स्थायीने नुकत्याच झालेल्या सभेत आयुक्तांना सूचना केल्या होत्या. त्यावर आयुक्तांनी ठरावानंतर दोन आठवड्यात त्याची अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले आहे. त्यामुळे स्थायीने प्रशासनावर चांगलीच जरब बसवल्याचे बोलले जात आहे.

स्थायी समितीला मागील आठवड्यामध्ये दोन महिने पूर्ण झाले आहेत. आजवर स्थायी सभेमध्ये जे काही ठराव झाले, त्यासंदर्भातील माहिती सदस्यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना मागितली होती. त्यावर 60 टक्के विभागामध्ये ठरावाची अंमलबजावणी सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र काही ठराव लेखी नसल्याने त्याची अंमलबजावणी झाली नाही.

आयुक्तांच्या सहीशिवाय अंमलबजावणी
स्थायीने जे ठराव केले आहेत, त्याची अंमलबजावणी आयुक्तांची सही घेण्याआधीच सुरु कऱण्यात आले आहेत. अनेक विभागांमध्ये आयुक्तांच्या सहीशिवाय बुके आणि श्रीफळ शाल देण्याचा ठराव निघताच त्याची अंमलबजावणी करण्यात आली. या ठरावावर आयुक्तांची सही घेण्यात आली नाही. त्यामुळे अनेक ठराव हे आयुक्तांच्या सहीशिवाय केले जात असल्याचे समोर येते आहे.

दोन ठरावाला वाटाण्याच्या अक्षदा
डॉ. राय यांना सक्तीची रजा आणि क्रीसील कंपनीचा ठेका रद्द करण्याच्या ठरावाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. स्थायी समितीमध्ये डॉ. राय यांना कॅथलॅब घोटाळ्याप्रकरणी ते दोषी असल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा ठराव करण्यात आला होता. या ठरावाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यासोबत शहरामध्ये अनेत प्रकल्पांना सल्ला देणार्‍या क्रीसील कंपनीचे काम बंद करावे या ठरावाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यावर स्थायीने आजवर केलेले ठराव आणि त्यांची अंमलबजावणी याची सखोल माहिती पुढील सभेत मांडण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.