स्थायीत अधिकार्‍यांवर ताशेरे!

0

जळगाव। महानगर पालिकेच्या स्थायी सभेत आरोग्य व अतिक्रमण विभागावर सदस्यांनी ताशेरे ओढले. तर आयुक्तांनी अधिकार्‍यांच्या कामाच्या पद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली.ही सभा महानगर पालिकेच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात घेण्यात आली. याप्रसंगी सभापती वर्षा खडके, आयुक्त जीवन सोनवणे, शहर अभियंता डि.एस.थोरात, नगरसचिव निरंजन सैंदाणे उपस्थित होते. सभेत भाजपाच्या सदस्य उज्वला बेंडाळे यांनी म्युनसीपल कॉलनीमधील सार्वजनीक शौचालयाची दयनीय अवस्था झाली असल्याचे सभापतींच्या निदर्शनास आणून दिले. या सार्वजनीक शौचालयांत पाणी येत नसल्याची तक्रार करूनही कोणतीही उपाय योजना करण्यात आलेली नसल्याने नाराजी व्यक्त केली.

महिलांचे आरोग्य धोक्यात
सार्वजीनक शौचालयाच्या टाकीत जंतू पडत असतांना आरोग्य विभाग सहकार्य करीत नसल्याची तक्रार बेंडाळे यांनी यावेळी केली. तसेच यामुळे महिलांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे सांगितले. ही समस्या काही महिन्यांपासून असतांना आरोग्य विभाग लक्ष देत नसल्याचे बेंडाळे यांनी सांगितले. याला उत्तर देतांना आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी पाहून घेतो असे मोघम उत्तर दिले. तर आयुक्तांनी आरोग्य अधिकार्‍यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करत सार्वजनीक शौचालय आणि शहरातील प्रत्येक भागात पाणी पोहचले पाहिजे आणि स्वच्छता झाली पाहिजे अशी सूचना पाणी पुरवठा व आरोग्य विभागाला दिल्यात.

प्रस्तावास विरोध
शहरातील खडीच्या रस्त्यांची दुरूस्ती करण्याचा प्रस्ताव सभागृहात आल्यावर पृथ्वीराज सोनवणे यांनी खडीचे रस्ते कसे दुरूस्त केले जातात असा प्रश्‍न उपस्थित केला. याला शहर अभियंता डी. एस. थोरात यांनी या रस्त्यांची दुरूस्ती अतिरिक्त खडी टाकून दरूस्ती केली जात असल्याचे स्पष्ट केले. प्रस्तावात कोणत्या रस्त्याचे काम केले जाणार आहे त्या रस्त्यांची यादी दिलेली नसल्याने प्रस्तावास विरोध केला. तसेच खडी टाकून दुरूस्त करण्यात येणार्‍या रस्त्यांची यादी पुढील सभेत सादर करण्याची मागणी यावेळी पृथ्वीराज सोनवणे यांनी केली. खडीचे रस्ते दुरूस्तीवर सोनवणे यांनी नाराजी व्यक्त केली.

तक्रारदारांचे नाव जाहीर करू नका
मनसेचे सदस्य बंटी जोशी यांनी त्यांच्या वार्डांतील अतिक्रमणचा प्रश्‍न उपस्थित करत रामदार कॉलनी परिसरात टपर्‍या वाढत असून यासंदर्भांत नागरिकांनी लोकशाही दिनी तक्रार देवून कारवाई केली जात नसल्याचे सभागृहात सांगितले. यासंदर्भांत अतिक्रमण अधिक्षक एच.एम. खान यांना अनंत जोशी यांनी फोनवर तक्रार करूनही अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली नसल्याने जोशी यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच अतिक्रमण संदर्भांत नागरिकांनी काही तक्रार केल्यास अतिक्रमण अधिक्षक बंटी भाऊंशी बोलून घ्या असे सूचवित असल्याचे सांगितले. यावर कारवाई करतांना काम कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे सुरूवातीला बघीतले पाहिजे तसेच सर्वच विभाग प्रमुखांनी तक्रारदारांचे नाव सांगू नये अशी सक्त ताकीद आयुक्त जीवन सोनवणे यांनी विभाग प्रमुखांना दिली.

नोंदणी नसलेल्या हॉकर्सच्या समावेशाची सूचना
गिरणा टाकीजवळील अतिक्रमण काढतांना नगरसेविकेने फोन करून अतिक्रमण राहू द्या असे सांगितल्याचे बंटी जोशी यांनी सांगितले असता यावर उज्वला बेंडाळे यांनी त्यांच्या वार्डांतील जेष्ठ नागरिकांना त्रास होवू नये यासाठी तीघ भाजीपालावाल्यांना जोपर्यंत हॉकर्स झोन आखून दिला जात नाही तापर्यंत विक्री करू द्यावी, टपरीधारक आणि इतर लोकांवर कारवाई केल्यास कोणतीही हरकत नसल्याचे सांगितले. याला उत्तर देतांना अतिक्रमण अधिक्षक एच.एम. खान यांनी दुधबुथ आणि टपरीधारकांना 2 दिवसापूर्वी सूचना दिल्या असल्याचे स्पष्ट केले. अतिक्रमणधारकांना कोणतीही पूर्व सूचना देण्याची गरज नसल्याचे सांगून नोंदणीकृत हॉकार्सला जागा देण्याचे आयुक्त जीवन सोनवणे यांनी सांगितले. तसेच शहरातील ज्या हॉकर्संनी नोंदणी केली नसेल अशा हॉकर्संची नोदणी करून घ्या अशा सूचना आयुक्तांनी दिल्यात. ज्या हॉकर्सला पर्यायी जागा दिलेली आहे, अशांनी त्यांच्या जागेवर व्यवसाय करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

अतिक्रमण अधिक्षक हप्ते घेत असल्याचा आरोप
बंटी जोशी यांनी महाबळ, एम.जे. कॉलेज, गणेश कॉलनी, रामानंद नगर, शिवाजी नगर, महाराणा प्रताप पुतळाजवळ अतिक्रमण वाढले असून भास्कर मार्केटला 80 ओटे तयर असून रामानंदला जागा आहे तेथे हॉकर्संला स्थलांतरीत करण्यात यावे असे सांगितले. अतिक्रमण वाढल्याने शहराचा सत्यानाश होत असल्याचा सात्विक संताप व्यक्त केला. बंटी जोशी यांनी त्याच्या वार्डांत अतिक्रमण झालेले मला चालणार असे निक्षुन सांगितले. तसेच फुले मार्केटप्रमाणे भोईटेमार्केटमधील दुकानदार ओट्यावर भाड्याने जागा देत असल्याचे चित्र असल्याचे सांगितले. अतिक्रमण अधिक्षकांची हप्तेखोरी सुरू असून अतिक्रमण अधिक्षकांना शहराबद्दल आपुलकी राहीली नसल्याचे जोशी स्पष्ट केले. अतिक्रमण निर्मुलनासाठी प्रभाग निहाय अधिकारी नेमण्यात यावेत अशी सूचना जोशी यांनी मांडली.