तिघांचीही ‘दादा-भाऊं’कडे जोरदार फिल्डिंग
पिंपरी-चिंचवड : ईश्वरचिठ्ठीने दगा दिल्याने स्थायी समितीच्या सभापतिपदावरून सीमा सावळे या पायउतार झाल्यानंतर या पदासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षात जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे आणि खासदार अमर साबळे यांच्या गटाकडून आपल्याच गटाला हे पद मिळावे, यासाठी वरिष्ठ पातळीवरदेखील फिल्डिंग लावण्यात आलेली आहे. तथापि, आ. लांडगे व आ. जगताप यांच्यात झालेल्या अलिखीत करारानुसार, महापौरपद आ. लांडगे गटाला तर स्थायीचे सभापतिपद आ. जगताप गटाला असे यापूर्वीच ठरलेले आहे. त्यानुसार, सीमा सावळे यांच्याजागी आ. जगताप यांच्याच गटाचा सभापती निवडला जाणार असला तरी, या पदासाठी आ. लांडगे गटाचे नगरसेवक राहुल जाधव, आ. जगताप गटाचे शीतल शिंदे, तसेच तीनही गटाशी सौख्य असलेले संदीप कस्पटे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. एका नगरसेवकाने तर खा. साबळे यांच्याकडे जोरदार ‘फिल्डिंग’ लावली असल्याची माहितीही हाती आली आहे. दुसरीकडे, आ. जगताप यांचे समर्थक आणि महापौरपदाची संधी हुकलेले नामदेव ढाके यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणीही एक गट करत असल्याने शहराध्यक्ष आ. जगताप यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
महापालिकेत विविध चर्चांना उधाण
स्थायी समिती म्हणजे महापालिकेच्या तिजोरीची चावी असते. त्यामुळे या समितीच्या सभापतिपदासाठी इच्छुकांनी जोरदार दबावगट निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. एका इच्छुकाने तर पक्षाच्या एका खासदाराकडे अर्थपूर्ण फिल्डिंग लावल्याची चर्चादेखील महापालिका वर्तुळात जोरदार सुरु आहे. हा इच्छुक संबंधित खासदाराच्या जवळचा मानला जातो, तसेच तो ‘दादा-भाऊ’ यांनाही आपण तुमचाच असल्याचे सांगत असतो, त्यामुळे या दबावतंत्राबद्दल सद्या महापालिकेत विविधांगी चर्चा सुरु झाली आहे. स्थायी समितीत वर्णी लावावी, यासाठी भाजपमध्ये किमान 30 ते 40 नगरसेवक इच्छुक आहेत. तर सभापतिपदासाठी राहुल जाधव, शीतल शिंदे, संदीप वाघेरे आणि ज्येष्ठ नगरसेवक नामदेव ढाके यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. तथापि, या चौघांपैकी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय फायदेशीर ठरेल, अशा वेगळ्याच व्यक्तीच्या नावावर मतौक्य होईल, अशी माहितीही पक्षाच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली आहे. सभापतिपदासाठी अनेक इच्छुक असले तरी, या पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.
सभापतिपद चिंचवडला?
पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आलेली आहे. आ. लांडगे यांचे कट्टर समर्थक नितीन काळजे यांची महापौरपदी वर्णी लागली असून, ते भाजपचे पहिले महापौर ठरले आहेत. तसेच, हा पहिलाच मान भोसरीला मिळाला आहे. सद्या महापौरपद आणि सत्तारुढ पक्षनेतेपद अशी दोन्ही महत्वाची पदे भोसरी मतदारसंघाला मिळालेली आहेत. तर उपमहापौरपद हे पिंपरी मतदारसंघाला मिळालेले आहे. त्यामुळे स्थायी समितीचे सभापतिपद चिंचवड मतदारसंघात देण्याबाबत ‘भाऊ-दादा’ हे राजकीय विचार करत आहेत. सीमा सावळे या आ. जगताप गटाच्या होत्या. त्यामुळे हे पद आ. जगताप गटालाच जाणार असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे जगताप गटाकडून नामदेव ढाके, शीतल शिंदे, शत्रुघ्न काटे यांचीही नावे चर्चेत आहेत. तर संदीप वाघेरे यांनीदेखील या पदासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होत आहे. आयाराम-गयारावविरुद्ध निष्ठावंत असा वाद निर्माण झाल्यास नामदेव ढाके, शीतल शिंदे, संदीप कस्पटे किंवा प्रा. उत्तम केंदळे या भाजपच्या जुन्या पदाधिकार्यांना संधी मिळेल, असेही सांगण्यात आले.
अशी आहे ‘स्थायी’ची रचना
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत. त्यात भाजपचे 10, राष्ट्रवादीचे चार, शिवसेना 1 आणि अपक्षांचा 1 असे संख्याबळ राहणार आहे. भाजपचे संख्याबळ जास्त असल्याने सभापतिपद हे भाजपलाच मिळणार आहे. स्थायी समितीची नियुक्ती ही दोन वर्षांची असते. दरवर्षी आठ सदस्य समितीतून बाहेर पडतात तर तेवढेच सदस्य नव्याने निवडले जातात. प्रथमवर्षी नियुक्ती झालेल्या सदस्याला एका वर्षानंतर ईश्वरचिठ्ठीने समितीतून बाहेर पडावे लागते. स्थायीच्या सभापती सीमा सावळे या पहिल्याच वर्षात या समितीतून बाहेर पडल्याने त्यांचे सभापतिपद गेले आहे.