‘स्थायी’साठीची नावे भाजप राज्य नेतृत्वाकडे; मात्र ‘नो रिप्लाय’

0

सर्वसाधारण सभा केली तहकूब; सदस्य निवडी 28 फेब्रुवारीच्या सभेत

पिंपरी-चिंचवड : महापालिका स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या आठ जागांवर नवीन सदस्यांची मंगळवारी होणारी निवड लांबणीवर पडली आहे. कारण भाजपच्या राज्य नेतृत्वाने अंतिम निर्णय घेण्यासाठी ने इच्छूकांची नावे मागवून घेतली आहेत. याबाबत कोणताही संदेश दुपारपर्यंत आला नाही. त्यामुळे सत्ताधारी भाजपने सर्वसाधारण तहकूब केली अशी जोरदार चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. ही सभा आता 28 फेब्रुवारीला होणार असून यामध्ये सदस्यांची निवड केली जाणार आहे.

एकूण जागा 8, त्यामध्ये भाजपचे सहा
स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत. त्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी दोन वर्षांचा असतो. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. तेवढेच सदस्य पुन्हा नव्याने निवडले जातात. भाजपचे सहा आणि राष्ट्रवादीच्या दोन नगरसेविका बाहेर पडल्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागा फेब्रुवारी अखेर भरणे बंधनकारक आहे. मंगळवारी सर्वसाधारण सभा होती. या सभेच्या विषयपत्रिकेवर पहिलाच विषय स्थायी सदस्य निवडीचा होता. परंतु, भाजपची नावे निश्‍चित झाली नसल्यामुळे महासभा तहकूब केली असल्याची, चर्चा आहे. ही सभा आता 28 फेब्रुवारीला होणार असून यामध्ये सदस्यांची निवड केली जाणार आहे.

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांकडे नावे
भाजपचे संघटन मंत्री रवी अनासपुरे यांनी सोमवारी (दि.19) पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात घेतली. या बैठकीत नगरसेवकांच्या नावांबाबत चर्चा करण्यात आली. कोणत्या नगरसेवकाला संधी द्यावी, अशा नगरसेवकांची नावे बंद पाकीटातून देण्यास कमिटीला सांगितले. नंतर सुचविलेली नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पाठविली गेली. त्यांच्याकडून दुपारपर्यंत संदेश येणे अपेक्षीत होते. परंतु, त्यांच्याकडून संदेश काही आला नाही. त्यामुळे सत्ताधार्‍यांनी सभा तहकूब केली, असल्याची चर्चा आहे.

‘भाजप’चे 11 सदस्य?
आता ही तहकूब सभा 28 फेब्रुवारीला होणार आहे. भाजपने 11 स्थायी समिती सदस्यांचे राजीनामे घेतले आहेत. चिठ्ठीतून वाचलेल्या पाच नगरसेवकांचे राजीनामे 28 फेब्रुवारीला नगरसचिवांकडे देऊन मंजूर केली जाऊ शकतात. त्याचदिवशी नवीन 11 सदस्यांची निवड केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे त्या जागी कोणाला संधी मिळते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.