‘स्थायी’साठीचे इच्छुक दोन दिवस गॅसवर

0

शहीद जवानांना आंदराजली वाहून महासभा तहकूब
भाजपसह, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या सदस्यांचा जीव वरखाली
पिंपरी-चिंचवड: महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यत्वासाठी इच्छुक असलेले नगरसेवक आजची महासभा तहकूब झाल्याने आणखी दोन दिवस गॅसवर आहेत. स्थायीत वर्णी लागावी, यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. फेब्रुवारी महिन्याची सभा बुधवारी आयोजित केली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते.

उद्या होणार आहे सभा
पुलवामा येथे तब्बल 350 किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्याने गुरुवारी (दि.14) सीआरपीएफच्या ताफ्यावर चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात 39 जवान शहीद झाले. या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्याची सूचना नगरसेविका सीमा सावळे यांनी मांडली. त्याला विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी अनुमोदन दिले. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून आजची महासभा शुक्रवार (दि.22) सकाळी अकरा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.

आठ नवीन सदस्य येणार
सभेच्या विषयपत्रिकेवर स्थायी समितीच्या फेब्रुवारीअखेर मुदत संपणार्‍या आठ सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती करण्याचा विषय होता. महापालिकेच्या स्थायी समितीत 16 सदस्य असतात. भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. भाजपचे सर्वाधिक 10 सदस्य समितीत आहेत. यातील गतवर्षी राजीनामा घेतलेल्या सदस्यांच्या जागेवर नियुक्ती झालेल्या भाजपच्या सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, अर्चना बारणे, विकास डोळस, अपक्ष साधना मळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू मिसाळ, मोरेश्‍वर भोंडवे आणि शिवसेनेचे अमित गावडे यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ फेब्रुवारीअखेर संपणार आहे. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची आज नियुक्ती केली जाणार होती.

भाजपमध्ये मोठी चुरस
सर्वाधिक सत्ताधारी भाजपच्या पाच सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे स्थायीत जाण्यासाठी भाजप नगरसेवकांमध्ये चूरस लागणार आहे. भाजपच्या ज्या सदस्यांची निवड होईल. त्यातील एकाची सभापतीपदी वर्णी लागणार आहे. त्यामुळे स्थायीत जाण्यासाठी सत्ताधारी पक्षातील अनेक नगरसेवक इच्छुक आहेत. तर, दोन जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 16 नगरसेवक इच्छुक आहेत. शिवसेनेच्या एका नगरसेवकांची स्थायीत वर्णी लागणार आहे. स्थायीत वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. इच्छुक नेत्यांचे उंबरठे झिजवत आहेत. आजची महासभा तहकूब झाल्याने इच्छुक आणखीन दोन दिवस गॅसवर आहेत. स्थायीत वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.