जळगाव : आकाशवाणी चौकातून दुपारी साडेआकरा वाजता महा नगरपालिकेच्या स्थायी सभापती वर्षा खडके या त्यांच्या वाहनातून महापालिकेत येत असतांना त्यांच्या कारमधून अचानक धूर निघू लागल्याने धावपळ उडाली होती. स्थायी सभापतींची गाडी आकाशवाणी चौकातील सिग्नलजवळ आल्यावर अचानक त्यांच्या कारच्या सायलेन्सरमधून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. गाडीला आग लागल्याच्या भीतीने इतर वाहनधारक देखील बाजूला झाले. चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बंद करुन बाजूला घेत सभापतींनी खाली उतरविले.
चालकाने दाखविले प्रसंगावधान
स्थायी सभापती वर्षा खडके यांना महानगर पालिकेकडून देण्यात आलेले शासकीय वाहन नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे सध्या सभापती या त्यांची स्वत:ची कार (एम.एच. 19 बी.बी. 0050) ही वापरत आहेत. आज सभापती खडके या कामानिमित्त काव्यरत्नावली चौक परिसरात गेल्या होत्या. त्यांच्या कारवर महापालिकेचे चालक शरीफ पिंजारी हे होते. परत येत असतांना आकाशवाणी चौकात सिग्नल नसल्याने पिंजारी यांनी गाडी थांबविली होती. कार उभी असतांना अचानक कारच्या सायलन्सरमधून मोठ्या प्रमाणात धूर निघाला. गाडीतून धूर निघाल्याने गाडीने पेट घेतला असावा असे वाटल्याने या ठिकाणी थांबलेल्या चारचाकी व दुचाकीस्वारांमध्ये खळबळ उडाली. त्यांनी आपल्या गाड्या लांब नेल्या. चालक पिंजारी यांनी गाडी बंद करुन सभापती वर्षा खडके यांना खाली उतरवले त्यांनतर त्यांनी कार बाजूला घेतली. त्यांनी कारची तपासणी केल्या कुठेही आग लागली नसल्याने त्यांनी पुन्हा सुरु केली. त्यानतंर त्यांनी सभापती यांना महापालिकेत सोडून कार दुरुस्तीसाठी पाठविल्याची माहीती दिली.