स्थायी सभेत पाणी पेटले

0

जळगाव। गेल्या आठ दिवसांपासून शहरवासीयांना पाणी मिळत नसल्याने पर्यायी व्यवस्थेवर चर्चा करण्याची मागणी भाजपा, अपक्ष नगरसेवकांनी स्थायी सभेत केली. यावेळी स्थायी सभापती वर्षा खडके यांनी सभा सुरू झाली आहे याची जाणीव त्यांना करून दिली. यावर भाजपाचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी आक्रमक होत शहरातील सहा लाख नागरिकांचा प्रश्‍न असून चर्चा झालीच पाहिजे असा होरा लावून धरला. सभापती पाण्याचा प्रश्‍नांवर चर्चा करण्यास अनुकूल नसल्याचे पाहून भाजपा नगरसेविका उज्वला बेंडाळे यांनी सभापतींना उद्देशून तुमच्या घरी बोअरींग असल्याने पाणी टंचाई जाणवली नसल्याचा आरोप केला. याला उत्तर देतांना सभापती खडके यांनी वैयक्तीक बोलू नका असा इशारा बेंडाळे यांना दिला. यानंतर सभापती खडके यांनी नगरसचिवांना विषय पत्रिकेवरील विषय घ्या अशी सूचना केली. तर याला उत्तर देत विरोधकांनी सभा होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला. स्थायी सभा सभापती वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा घेण्यात आली. याप्रसंगी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, नगरसचिव निरंजन सैंदाणे उपस्थित होेते.

विरोधकांचे प्रसिध्दीसाठी राजकारण : सभा आटोपल्यानंतर सभापती वर्षा खडके यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले की, पाणी प्रश्‍नाबाबत एवढीच कळकळ होती तर सभा सुरू होण्यापूर्वी त्यांच्या दालनात विरोधकांनी चर्चा करायला हवी होती अशी अपेक्षा व्यक्त केली. आज शहरात पाणी पुरवठा सुरळीत झालेला आहे. महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी रात्रंदिवस काम करून पाणी पुरवठा सुरळीत केलेला असतांना विरोधक त्यांचे कौतुक न करता प्रसिद्धीसाठी राजकारण करीत आहेत असा आरोप केला. नैसर्गिक आपत्ती असल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. नागरिकांना तात्काळ पाणी देण्याचा प्रयत्न महापालिकेने केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. विरोधकांना खरच शहरातील जनतेची कळकळ असल्यास त्यांनी दालनात चर्चा करायला हवी अशी अपेक्षा सभापती खडके यांनी व्यक्त केली. विषय पत्रिकेवर अ‍ॅलमचा आल्यावर बोलण्याची परवानगी देणार होती असे स्पष्ट केले. पाणी प्रश्‍नासारखेच विषय पत्रिकेवरील विषय महत्त्वाचे होते असेही खडके यांनी सांगितले.

सभा संपेपर्यत विरोधकांचे सभापतींसमोर धरणे आंदोलन
पाण्याच्या प्रश्‍नांवर चर्चेस सभापती मान्यता देत नसल्याचे पाहून भाजपाचे उज्वला बेंडाळे, पृथ्वीराज सोनवणे, अपक्ष नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी सभापतींसमोर जावून चर्चा करण्याचे आवाहान केले. सभापती खडके यांनी सभा सुरूच ठेवल्याने त्यांचा निषेध करत बेंडाळे, सोनवणे, दारकुंडे यांनी वेलमध्ये बैठक मारली. सभा संपेपर्यत त्यांनी सभापतींसमोर धरणे आंदोलन केले. यावेळी त्यांनी खान्देश आघाडीचा धीक्कार असो, सत्ताधारी पक्षांचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यास सुरूवात केली. सत्ताधारी सहा लाख जनतेस वेठीस धरत आहे असा आरोप यावेळी विरोधकांकडून करण्यात येत होता.

10 मिनिटांत संपविली सभा
विरोधकांच्या घोषणाबाजीतच अजेंडावरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. अजेंडावर एकूण 11 विषय असतांना सर्व विषय केवळ 10 मिनीटांत मंजूर करण्यात आले. अजेंडावरील विषयानंतर सभापतींनी पाण्यावर चर्चा न करताच सभागृहातून काढता पाय घेतला. सभागृहात चर्चा न झाल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. शहरातील सहा लाख नागरिकांचा प्रश्‍न असतांना सभा दहा मिनीटांतच गुंडाळण्यात आल्याने विरोधक आक्रमक झाले होते. मागील दोन सभेपासून विरोधकांना बोलण्याची संधी सभापती देत नसल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला.
पाणी वितरणाबाबत

चर्चा न झाल्याची विरोधकांची खंत
विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली, महापालिकेने विद्युत वितरणकडून एक्सप्रेस फिडर घेतलेले आहे. ते बंद राहयाला नको अशी अपेक्षा व्यक्त केली. एक्सप्रेस फिडर बंद राहिल्याने महावितरणवर फौंजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. एक्सप्रेस फिडर दिले असतांना विज खंडीत करू शकत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी भाजपा गटनेते सुनील माळी, पृथ्वीराज सोनवणे, उज्वला बेंडाळे, नवनाथ दारकुंडे उपस्थित होते. सत्ताधार्‍यांनी चर्चा करायला हवी होती अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलून दाखविली. उज्वला बेंडाळे यांनी सत्ताधारी गेल्या दोन सभांपासून सभा गुंडाळण्याचे काम करीत असल्याचा थेट आरोप केला. पहिल्या पावसात पाणी वितरणाची ही परिस्थिती आहे. असा प्रकार पुन्हा उद्भवू नये यासाठी सभागृहात चर्चा होणे अपेक्षित होते मात्र चर्चा न झाल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखविली. दारकुंडे यांनी आजही शहरातील निम्या नागरिकांच्या घरात पाणी पोहचले नसल्याचे सांगितले. महापौर इतर विषयांवर प्रेस घेत असतात मात्र पाण्यासारख्या विषयांवर त्यांनी एकही प्रेस घेतली नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. सत्ताधार्‍यांनी चर्चा न करणे म्हणजे त्यांचा नाकर्तेपणा असल्याचा आरोप केला.