धुळे । प्रत्येक आठवड्याला होणार्या मनपा स्थायी सभेत सतत आरोग्याच्या प्रश्नावर नगरसेवक अधिकार्यांना धारेवर धरत असतात. दि.13 रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत नगरसेविका मायादेवी परदेशी यांनी पाचकंदील बाजारगल्लीत महिलांना शौचालयाची सुविधा नसल्याची तक्रार करत शहरातील आरोग्याच्या समस्येवर भाष्य केले. स्थायी सभापती कैलास चौधरींसमवेत उपायुक्त रविंद्र जाधव, नगरसचिव मनोज वाघ,सदस्य संजय गुजराथी,मायादेवी परदेशी, ज्योत्स्ना पाटील,यमुनाबाई जाधव, ललिता आघाव,बालिबेन मंडोरे, हाजी ईस्माईल पठाण,साबीर मोतेवार, कमलेश देवरे,बोरसे, गुलाब माळी, दिपक शेलार आदी उपस्थित होते.
भंगार साहित्य तातडीने हलविल्याबद्दल आभार
मायादेवी परदेशी यांनी आपल्या चर्चेला सुरुवात करतांना सर्वप्रथम महापालिका आवारात असलेल्या बापट दवाखान्यातील भंगार साहित्य तातडीने हलविल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानून कौतूक केले. मनपाच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा व्यवस्थितपणे सुरु आहेत. मात्र तेथील शिक्षकांना पुरेसे मानधन मिळत नसल्याची तक्रार व त्यांना कायम करण्यात यावे, अशी मागणी केली. यावर उत्तर देतांना उपायुक्त रविंद्र जाधव म्हणाले की, मनपाच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांच्या मानधनासाठी अडीच ते साडेतीन लाख रुपये देण्यात आले आहे. या सभेत मायादेवी परदेशी यांनी पाचकंदील सारख्या वर्दळीच्या भागात महिला स्वच्छतागृह नसल्याची तक्रार करीत कामानिमित्त तसेच खरेदीसाठी बाजारपेठेत येणार्या महिलांची त्यामुळे कुचंबना होते, असे मत त्यांनी मांडले. शिवाय प्रशासन समस्या गंभीर झाल्याशिवाय लक्षच देत नसल्याचा आरोप केला.