पिंपरी-चिंचवड : महावितरण कडील भूमीगत सेवावाहिनी टाकण्यासाठी व सेवावाहिनी दुरुस्तीसाठी रस्ता खोदाई करण्यास महावितरण व नागपूर महापालिका यांच्यातील सामंजस्य करारनाम्यानुसार परवानगी देणेबाबतची कार्यवाही करणेबाबतचे धोरणात्मक निर्णयासाठी हा विषय महापालिका सभेकडे पाठविण्याची शिफारस स्थायी समिती सभेत करण्यात आली. यासह शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणार्या सुमारे 64 कोटी 29 लाख 95 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
अशी आहेत कामे
डुडुळगाव गट नंबर 18 व 24 मीटर विकास आराखड्यातील मोशी आळंदी रस्ता माउलीनगर ते पुणे आळंदी रस्ता विकसित (41 कोटी 95 लाख 56 हजार), कृष्णानगरमधील शिवतेजनगर मुख्य रस्त्याचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण (एक कोटी 37 लाख 64 हजार), ज्योतीबानगर येथील सोनवणे वस्तीतील 24 मीटर रस्ता रुंदीकरण करुन स्टॉर्मवॉटर लाईन टाकून रस्त्याचे डांबरीकरण (एक कोटी 95 लाख 86 हजार), सांगवी किवळे बीआरटीएस रस्त्यावरील जगताप डेअरी साई चौक ते मुकाई चौका पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण (दोन कोटी 66 लाख रुपये), निगडी गावठाणातील एलआयसी इमारत ते पवळे उड्डाणपुलापर्यंतच्या रस्त्याचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण (52 लाख), पिंपळे गुरव येथील मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण (तीन कोटी 71 हजार), भोसरी दिघी शिवेवरील रस्ता (81 लाख), मोशी- देहू रस्ता परिसरातील डीपी रस्ते (78 लाख).