कल्याण । कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा सन 2018-2019 चा 1809.48 कोटींचा अर्थसंकल्प तसेच सन 2017-2018 चा सुधारित अर्थसंकल्प स्थायी समितीचे सभापती राहुल दामले यांनी आज महासभेत मंजुरीसाठी सादर केला. या अर्थसंकल्पात स्थायी समितीने अपेक्षेप्रमाणे आयुक्तांचा अंदाजापेक्षा सुमारे 118 कोटींची वाढ सुचविली आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या सुमार असल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल 650 कोटी रुपयांच्या विकासकामांना कात्री लावण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. स्थायी समितिचे सभापती राहुल दामले यांनी सोमवारी महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे सन 2018-2019 चा 1809.48 कोटींचा अर्थसंकल्प व सन 2017-2018 चा सुधारित अर्थसंकल्प महासभेच्या मंजुरीसाठी सादर केला.
यावेळी आयुक्त गोविंद बोडके, उपमहापौर मोरेश्वर भोईर, सचिव संजय जाधव आदी उपस्थित होते. मुंबईच्या धर्तीवर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कल्याण डोंबिवलीत क्लीनअप मार्शल नेमणार, तरुणांना विरंगुळ्यासाठी युथ पार्क उभारणे, प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी ठीकठिकाणी डिजिटल डिस्प्ले लावणे, डोंबिवलीत वाहनतळ बांधणे, सायकल ट्रॅक, आद्यक्रांतीकारक वासुदेव फडके यांचे वास्तव्य असलेल्या गुहेचे सुशोभीकरण, कल्याण डोंबिवली खाडीकिनारी वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट, पक्षी निरीक्षणासाठी मनोरे, दुर्गाडी किल्ला येथील उद्यान आणि विहिरीचे पुनरुज्जीवन, अग्निशमन दलासाठी नविन वाहन खरेदी, केडीएमटीच्या महसुली खर्चासाठी निधीची तरतूद, सर्व प्रभागांमध्ये ई टॉयलेट, पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी झोनिंग पद्धत राबवणार, 27 गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा, तारांगण प्रकल्प उभारणार, पत्रकार आपत्कालीन मदत निधी यासह भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी निधीची तरतूद या सभापतींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या बाबी आहेत.
सन 2018-2019 च्या अर्थसंकल्पाच्या उत्पन्नामधील महत्त्वाच्या बाबींमध्ये स्थायी समितीने मालमत्ता करापोटी 375 कोटी 35 लाखांचे उत्पन्न गृहीत धरले आहे. प्रशासनाने अपेक्षित केलेल्या उत्पन्नापेक्षा 35 कोटी रुपयांची जादा वाढ स्थायी समितीने सुचविली आहे. जीएसटी अनुदाना अंतर्गत 263.16 लक्ष उत्पन्नाचे उद्दिष्ट गृहीत धरण्यात आले आहे. याशिवाय पालिकेने पाणीपट्टी वसुलीचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्यातून समितीने 70 कोटींचे उत्पन्न गृहीत धरले आहे. प्रशासनाने निश्चित केलेल्या उद्दिष्टापैकी ही वाढ 10 कोटींनी जास्त आहे. महापालिकेच्या मालमत्ता करापोटी 27 कोटी 50 लाखांचे उत्पन्न गृहीत धरण्यात आले आहे. प्रशासनाने गृहीत धरलेला अंदाजापेक्षा 15 कोटींनी ही वाढ जास्त आहे. विशेष अधिनियमाखालील वसुलीत 150.10 कोटींचे उत्पन्न गृहीत धरण्यात आले आहे. इतर सेवा शुल्क परवाने व संकीर्ण जमाद्वारे 61.32 कोटी अपेक्षित धरण्यात आले आहे. खर्चाच्या बाजूमध्ये स्थायी समितीने एकूण 1809 .27 कोटी खर्चाचा अंदाज दिला असून 21 लाख रुपये शिल्लक राहतील असे प्रस्तावात म्हटले आहे.
कल्याण डोंबिवलीमध्येही क्लीनअप मार्शल येणार
यंदाच्या अर्थसंकल्पात प्रथमच युथ पार्कसाठी 50 लाखांची तर उंबर्डे येथे सायकल ट्रॅकसाठी 75 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटसाठी 1 कोटीची तरतूद आहे. त्या अंतर्गत डोंबिवलीतील खाडी किनारा विकास व सुशोभीकरण करण्यात येईल. त्यासाठी एकूण 35 कोटीची गरज असून त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. परिवहन उपक्रमासाठी 13 कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आली असून महसुली खर्चासाठी 3 कोटींची वाढ यात सुचविण्यात आली आहे. तसेच डोंबिवलीतील 5 वर्षांपासून बंद पडलेल्या सुतीकागृहाच्या पुनर्बांधणीसाठी 2.50 कोटींची तरतूद करण्यात आली असून शासनामार्फत 2.50 कोटी अनुदान मिळाले आहे. पालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी 7 कोटींची तर 27 गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी 3 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या तरतुदीपेक्षा 50 लाखांनी ही वाढ जास्त आहे. याशिवाय शिक्षण विभागासाठी एकूण 1.71 कोटी, अग्निशमन विभागासाठी 1 कोटी, तसेच शहर स्वच्छतेसाठी क्लीन अप मार्शलसाठीही तरतूद आहे. विशेष म्हणजे नगरसेवक निधीसाठी प्रशासनाने प्रत्येकी 15 लाखांची तरतूद कायम ठेवतानाच स्थायी समितीने सुचवलेल्या कामासाठी प्रत्येकी 1 कोटी, पालिकेच्या पदाधिकार्यांना प्रत्येकी 25 लाख, प्रभाग अध्यक्षांसाठी प्रत्येकी 10 लाख एवढ्या निधीची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात प्रथमच पत्रकारांसाठी आपत्कालीन मदत निधी अंतर्गत 50 लाखांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये
तरुणांना विरंगुळ्यासाठी युथ पार्क करण्यासाठी 50 लाखांची तरतूद.
प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी ठीकठिकाणी डिजिटल डिस्प्लेसाठी 60 लाखांची तरतूद.
डोंबिवली एमआयडीसीतील गणपती तलाव सुशोभीकरणासाठी 25 लाखांची तरतूद.
डोंबिवलीत टाटा पॉवरलेनखाली वाहनतळ बांधण्याचा मानस.
बंद असलेल्या डोंबिवलीतील सूतिकागृह सुरू करण्यासाठी 2.50 लाख तरतूद.
कल्याण डोंबिवलीतही क्लीनअप मार्शल ठेवले जाणार.
उंबर्डे येथे 3 किलोमीटरचा सायकल ट्रॅकसाठी 75 लाख तरतूद.
नेतीवली टेकडी येथे आद्यक्रांतीकारक वासुदेव फडके गुहेचे सुशोभीकरणासाठी 50 लाख.
कल्याण डोंबिवली खाडीकिनारी वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटसाठी 1 कोटींची तरतूद.
खाडीकिनारी पक्षी निरीक्षणासाठी 2 मनोरे उभारणार 15 लाखांची तरतूद.
दुर्गाडी किल्ला परिसरात उद्यान आणि विहिरीचे पुनरुज्जीवनासाठी 25 लाखांची तरतूद.
पालिका संगणक विभागाची दुरुस्ती आणि निगा राखण्यसाठी 80 लाखांची तरतूद.
अग्निशमन दलाच्या नविन वाहन खरेदीसाठी 1 कोटी तरतूद.