पुणे । पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर किसन मोहोळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा टिंगरे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक अपंग कल्याण आयुक्त तथा पीठासीन अधिकारी नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सकाळी 11 वाजता पार पडली. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी देण्यात आलेल्या 15 मिनिटांच्या कालावधीत आघाडीच्या उमेदवार टिंगरे यांनी अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या वतीने मुरलीधर मोहोळ आणि सुनील कांबळे यांची नावे चर्चेत होती. शेवटच्या क्षणाला मोहोळ यांचे नाव जाहीर करण्यात आले. मोहोळ हे प्रभाग क्रमांक 12 मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनीमधून निवडून आले आहेत.
नवनिर्वाचित स्थायीसमिती अध्यक्ष मोहळ यांची नगरसेवक पदाची ही तिसरी टर्म असून त्यांनी शिक्षण मंडळ अध्यक्षपद देखील भूषवीले आहे. महाराष्ट्र युवा मोर्चा उपाध्यक्ष, युवा मोर्चा पुणे शहर अध्यक्ष, शहर सरचिटणीस, वॉर्ड अध्यक्ष अशी भाजपची विविध प्रकारची पदे त्यांनी भूषवली आहेत.
सर्वांना बरोबर घेऊन पुण्याचा विकास साधण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. भाजपने प्रसिद्ध केलेल्या वचननाम्यामुळे हे यश मिळाले आहे. याकडे लक्ष केंद्रीत करूनच पुणेकरांनी भाजपला मतदान केले आहे. आता तो वचननामा पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मोहळ यांनी सांगितले.
मुरलीधर मोहळ, स्थायी समिती अध्यक्ष