स्थायी समिती अध्यक्षपदी विलास मडिगेरी निश्‍चित

0

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) – महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ भाजपचे निष्ठावान नगरसेवक विलास मडिगेरी यांच्या गळ्यात पडणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यांच्या नावावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर, भाजपच्या एका आमदाराने शीतल शिंदे आणि दुसर्‍या आमदाराने राहुल जाधव यांच्यासाठी आग्रह धरला असल्याचे समजते.

रिक्त आठ जागा भरल्या
महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या आठ सदस्यांची आज (बुधवारी) सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये भाजपकडून विलास मडिगेरी, राहुल जाधव, शीतल शिंदे, ममता गायकवाड, नम्रता लोंढे आणि सागर अंगोळकर यांची वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन प्रदेश भाजपचे सरचिटणीस आणि विधानपरिषदेचे आमदार सुजितसिंग ठाकूर यांनी स्थायीत निवड करण्याच्या नगरसेवकांची नावे पालिकेतील पदाधिकार्‍यांना दिली. स्थायीत सदस्यांची निवड करताना मुख्यमंत्र्यांनी गटा-तटाचा समतोल घातला आहे. आयात चार आणि जुन्या दोन अशा सहा नगरसेवकांना संधी दिली आहे.

निष्ठावान कार्यकर्ता अशी ओळख
स्थायी समितीत सदस्य म्हणून घेतल्यास आपल्याला अध्यक्षपद द्यावे. अन्यथा सभागृह नेतेपद द्यावे, अशी मागणी मडिगेरी यांनी पक्षाकडे केली होती. त्यानंतर मडिगेरी यांना देण्याचे निश्‍चित करण्यात आल्याचे समजते. मडिगेरी हे पक्षाचे निष्ठावान आहेत. त्यांच्या पत्नी दोनवेळा पालिकेच्या नगरसेविका होत्या. त्यामुळे त्यांना स्थायी समितीचे अध्यक्ष करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पदाधिकार्‍यांना दिल्या असल्याचे बोलले जाते. त्यामुळे मडिगेरी यांची निवड जवळ-जवळ निश्‍चित असल्याची चर्चा आहे.

शीतल शिंदे, राहुल जाधवही आग्रही
भाजपच्या एका आमदाराने शीतल शिंदे आणि दुसर्‍या आमदाराने राहुल जाधव यांच्यासाठी आग्रह धरला असल्याची चर्चा आहे. जुन्या गटाने देखील शिंदे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. परंतु, मुख्यमंत्र्यांचे पारडे मडिगेरी यांच्याकडे झुकल्याचे दिसताच जुन्या गटानेदेखील मडिगेरी यांचे नाव उचलून धरले असल्याचे, बोलले जात आहे.