ठाणे : ठाणे महापालिकेच्या गत महासभेत महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सदस्यांची नियुक्ती प्रचंड गदारोळात करण्यात आली. विरोधकांनी त्या नियुक्ती प्रक्रियेलाच आक्षेप घेत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. असे असताना स्थायी समितीच्या सभापती निवडीसाठी बैठक बोलावण्याचे पत्र महापौर मीनाक्षी शिंदे यांनी महापालिका सचिव मनीष जोशी यांना दिले आहे.
महापौर शिंदे यांनी स्थायी समितीच्या सभापतींची निवड करण्यासाठी पालिका सचिवांना पत्र देऊन बैठक बोलावण्यास सांगितले आहे. याबाबत पालिका सचिवांनी महापौरांनी पत्र दिल्याचे सांगितले. त्यामुळे येत्या काही दिवसात ही बैठक लावण्यात येणार आहे. स्थायी समितीच्या सदस्य निवडीच्या कार्यपद्धतीला राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्षेप घेतला असून त्याविरोधात विरोधी पक्षनेते हे मिलिंद पाटील यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. दरम्यान, स्थायी समितीचा सभापती निवडण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. कॉंग्रेसला आपल्या सोबत घेतल्याने वाढलेल्या संख्याबळाच्या आधारावर शिवसेनेचा सभापती निवडून येण्याची स्पष्ट चिन्हे आहेत.
ठाणे जिल्हा न्यायालयाने कोकण विभागीय आयुक्तांच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती ( अस्थगन) दिल्याने महापौर मीनाक्षी शिंदे यांनी महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीचा आधार घेत नवे संख्याबळ जाहीर केले. त्यानुसार कॉंग्रेस नगरसेवकांना शिवसेनेच्या गटासोबत जोडले. त्याला विरोधकांनी आक्षेप घेत असताना गोंधळाच्या वातावरणात स्थायी समितीसाठी शिवसेनेचे ९, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ४ तर भाजपचे ३ सदस्यांची निवड घोषित केली गेली. महापौरांच्या या कार्यपद्धतीला राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे.