जळगाव । जिल्हा परिषदेची नवनियुक्त कार्यकारीणी जाहीर झाली आहे. जिल्हा परिषदेच्या कामकाजाला वेग आला आहे. जिल्हा परिषदेची 24 एप्रिल रोजी घेण्यात आलेली स्थायी समिती बैठक कोरम अभावी तहकुब करण्यात आली होती. ही स्थायी समिती बैठक शुक्रवारी 26 रोजी घेण्यात येणार आहे. या बैठकीचा अजेंडा जिल्हा परिषदेतर्फे जाहीर करण्यात आला आहे. या सभेत बांधकाम विभागातील कामाचे सुरक्षा म्हणून घेण्यात आलेली अनामत रक्कम परत करण्यास मान्यता देणे, सामान्य प्रशासन विभागांतर्गत कार्यकारी अभियंता यांच्याकडील वाहन क्रमांक एम.एच.19 ए.एम.0999, पंचायत समिती यावल यांच्याकडील वाहन क्रमांक एम.एच.19 एम.0052, मुख्य लेखाधिकारी व वित्त विभाग यांच्याकडील वाहन क्रमांक एम.एच.19 एम.0161, वाहन क्रमांक एच.19. जी.9995 अशी चार वाहने निर्लेखनासंबंधी शासनाच्या अटी व शर्ती पुर्ण करीत असल्याने सदरचे वाहन निर्लेखन करुन पर्यायी वाहन खरेदीस मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव मांडणे, पाचोरा तालुक्यातील पिंप्री येथे मदरसासाठी देण्यात आलेल्या जागेचा ठराव रद्द करण्याबाबत, पाचोरा तालुक्यातील आसनखेडा येथील ग्रामपंचायतीने केलेल्या जागेची फेरफार नोंदी संबंधी ठराव पास करणे आदी विषय 26 रोजी होणार्या स्थायी समितीच्या सभेत मांडण्यात येणार आहे.