शिरपूर (राजेंद्र पाटील) । शिरपूर तालुक्यातील फत्तेपूर फॉरेस्ट या गावात गेल्या काही वर्षापासुन पाणी टंचाई भासत आहे. नागरिकांना यामुळे कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत आहे. या गावात स्थिती विदारक असून याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शासन आदिवासींच्या मुलींनी शिक्षण घ्यावे यासाठी लाखो रूपये अनुदान दिले जाते. मात्र या गावात पिण्याचे पाण्यासाठी मुलींना मैलो पायी जावून पाणी आणावे लागते. त्यामुळे वेळेवर शाळेत जाता येत नाही. अर्थातच पाण्यामुळे या येथील मुली शिक्षणापासून वंचीत राहत आहेत.
शासनाच्या निधीचा योग्य विनीयोग नाही
गेल्या दोन वर्षापासून या ग्रामपंचायतीने पेसा व चौदाव्या वित्त आयोगाचा कुठल्याही निधीचा विनीयोग केलेला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे. या गावापासून एक किमी अंतरावरील वांदर्यापाडा येथे पांझरतलाव आहे.त्या परिसरात आताही मुबलक पाणी आहे. अनेकदा ग्रामस्थांनी संबधित अधिकार्यांना तेथे विहिर खोदून पाणी टंचाई सुटवू शकेल असे असतांना सुद्धा अद्यापपर्यंत त्या परिसात योजना आखण्यात आलेली नाही. त्या परिसरात मुबलक पाणी असल्यामुळे शेतीदेखील हिरवीगार आहे, परंतू ते भूजल विभागाच्या अधिकार्यांच्या लक्षात येत नाही. शासनाच्या निधीचा योग्य विनीयोग न करता, आतापर्यंत या विभागाने केलेल्या तीनही योजना त्यांच्या हट्टामुळे फेल झाल्या आहेत.
आधी पाणी मग प्रसुती !
गावात आरोग्य उपकेंद्र आहे. गावातील गरोदर महिलांना प्रसुतीसाठी घेवून गेले तर सोबत पाणी घेवून या असे सांगीतले जाते. कारण उपकेंद्रादेखील पाणी नसल्यामुळे प्रसुतीसाठी महिलांना सोबत पाणी घेवून जावे लागते. पाण्याअभावी या गावाची परिस्थती दिवसेंदिवस बिकट होत आहे असेच चित्र दिसते.
ग्रामस्थ पाणी पाजत नाहीत
उन्हाळ्यात या गावात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई भासते. मार्च ते मे पर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिकविणार्यां शिक्षकांना सुद्धा ग्रामस्थ पाण्याला विचारत नाही. त्यामुळे त्या शाळेतील शिक्षकांना घरूनच पाण्याच्या बाटल्या सोबत आणावे लागते. गावकर्यांनाच पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्यामुळे ते पाण्याची काटकसर करून वापर करतात.
– संजय खैरणार प्रा.शि
पाणी आणल्यावर खिचडी शिजते
गावात पाणी नसल्यामुळे महिलांना पाण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागते. जि.प.शाळेत एकूण 187 मुले पटावर असतांना निम्मे मुले शाळेत येतात. त्यांच्यासाठी शाळेत खिचडी शिजविण्यासाठी गावापासुन लांब दिड ते दोन किमी पायी जावून पाणी आणावे लागते. तेव्हा कुठे मुलांना खिचडी खायला मिळते. एवढे करूनही फक्त हजार रूपये मानधन मिळते.
-गांजूबाई पावरा, मदतनिस
समस्या लवकरच सोडवू
आदीवासी भागातील अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई भासू लागली आहे. त्या गांवासाठी शासनाकडून पेयजल योजना राबवीली जाणार आहे. योजनेचा आराखडा तयार झाला असून येत्या 13 तारखेला होणार्या पं.स सभेत अंमलबजावणीची मंजूरी घेवून प्रत्यक्ष कामाला सुरवात केली जाणार आहे.
– काशिराम पावरा,आमदार,शिरपूर
प्रशासनाचे गावाकडे दुर्लक्ष
अनेकदा या गावातील पाणी टंचाई संदर्भात संबंधित विभागातील अधिकार्यांशी चर्चा झाली आहे. पेयजल योजनेत आराखडा मंजूर झाल्याचे सांगण्यात येते, पंरतू प्रत्यक्षात अजून ही योजना गावात कार्यान्वीत झालेली नाही. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनदेखील गावाकडे दुलर्ष करत आहे. ग्रामसेवक सुद्धा महिनो महिने गावात फिरकत नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासुन कुठल्याच योजना राबविण्यात आलेल्या नाहीत. स्वत:सह गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाणी आणल्याशिवाय अन्न शिजत नाही. त्यामुळे या गावातील महिला फक्त दिवसभर पाण्यासाठी धावतात. पाणी नसल्यामुळे या गावातील मुलांचे लग्न करण्यासदेखील अडथळा निर्माण झाला आहे. निदान वरिष्ठ अधिकार्यांनी आता तरी भूजल अधिकार्यांना पाठीशी न घालता ग्रामस्थांशी चर्चा करून योजना आखावी.
-रूलाबाई पवार, सभापती,शिरपूर पंचायत समीती