19 रोजी नाटकाचा प्रयोग ; प्रायोगिक नाट्य चळवळीला संजीवनी देण्याचा प्रयत्न
भुसावळ- व्यावसायिक नाटकांच्या तोडीस तोड निर्मिती करणार्या महाराष्ट्रातील विविध संस्थाच्या सहकार्याने स्नेहयात्री प्रतिष्ठान भुसावळ शहरात एक आगळी-वेगळी सभासद योजना सुरू करीत आहे. मंगळवार, 19 रोजी रात्री आठ वाजता रेल्वेच्या श्रीकृष्णचंद्र सभागृहात ‘झेंडूचं फुल’ या प्रयोगाच्या शुभारंभाने सभासद योजनेचा प्रारंभ करून प्रायोगिक नाट्य चळवळीला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भुसावळ कलावंतांची खाण मात्र नाट्यगृहाची अडचण
भुसावळ ही कलावंतांची खाण असून शहराला मोठा सांस्कृतिक वारसादेखील आहे मात्र नाट्य कलावंतांना हक्काचे नाट्यगृह नसल्याने त्यांना महागड्या ठिकाणी प्रयोग सादर करावे लागतात मात्र दर्जेदार नाटकं व्यावसायीक गणितं आणि आयोजनाच्या खर्चात अडकून तीन ते चार प्रयोगातच लुप्त होतात. संपूर्ण महाराष्ट्रात राज्य नाट्य स्पर्धेेच्या माध्यमातून दरवर्षी जवळपास 100 ते 150 दर्जेदार मराठी नाटकांची निर्मिती होते. दर्जेदार नवनवीन संहिता (स्क्रीप्ट), वैविध्यपूर्ण आशय व विषय, नव्या दमाचे कलावंत, तंत्र आणि सादरीकरणाचे नवनवीन प्रयोग रंगमंचावर साकार होतात. या स्पर्धेनेच मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीला अनेक अभिनयसंपन्न कलावंत, तंत्रज्ञ दिले आहेत मात्र दरवर्षी निर्मिती होत असलेली ही 100 ते 150 अशा नाटकांना रंगमंच उपलब्ध होत नाही वा प्रसंगी आयोजक मिळत नाही आणि पर्यायाने ही नाटकंरसिकांपर्यंत पोहोचत नसल्याचे भुसावळातील कलावंतांना शल्य आहे. पालिका प्रशासनाने नाट्यप्रेमींची अडचण लक्षात घेता नाट्यगृहाला चालना देणे काळाची गरज आहे.
नाट्य चळवळीला संजीवनी देण्याचा प्रयत्न
स्नेहयात्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विरेंद्र पाटील यांनी नाट्य चळवळीला संजीवनी देण्याचा प्रयत्न केला असून सभासद योजनेत वर्षाला सहा नाटकांचे प्रयोग सादर केले जाणार आहे. अल्प वार्षिक वर्गणीत गाजलेल्या आणि दर्जेदार नाटकांची मेजवानी उपलब्ध करून दिली जाणार आहे शिवाय मंगळवार, 19 रोजी रात्री आठ वाजता रेल्वेच्या श्रीकृष्णचंद्र सभागृहात ‘झेंडूचं फुल’ या नाटकाच्या प्रयोगापासून वार्षिक् सभासद नोंदणीला प्रारंभ केला जाणार आहे. रसिकांनी वार्षिक सभासद योजनेसाठी 9225123111, 9271686376 तसेच 8600815878 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष विरेंद्र पाटील यांनी केले आहे.