धुळे : धुळे जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात खासगी शाळांचे सध्या चांगलेच पेव फुटले असून खासगी शाळांमध्ये देण्यात येणार्या सोयीसुविधा, शैक्षणिक दर्जा, सुसज्ज इमारत, प्रयोगशाळा, तज्ज्ञ शिक्षक आदींची मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सध्या विविध खासगी शाळांकडून करण्यात येत आहे. शैक्षणिक क्षेत्रात खासगी शाळांचे सध्याच्या काळात वाढलेले अतिक्रमण पाहता शासनाची अनुदानित विद्यालये व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याहून म्हणजे विद्यार्थ्यांची मानसिकता आणि पालकांचा गोंधळ उडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तसेच खासगी शाळा विद्यार्थ्यांसाठीचे शालेय साहित्य तसेच गणवेश ही शाळेतूनच घेण्याची बंधणे घालत असल्याने ही बाब पालकांना जिकिरीची वाटत आहे. तर शासनाने नवीन नियमानुसार सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत दिला जाणारा गणवेश यापुढे पालकांनी बाजारातून स्वतः विकत घेणे बंधनकारक केल्यामुळे पालकांची चांगलीच कसरत होत आहे.
गणवेश पालकांना घेणे जिकीरीचे
विद्यार्थांच्या शालेय गणवेश शाळेतूनच घेणे बंधनकारक करणार्या शिक्षण संस्थाना शासनाने चाप लावला आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार सर्व शिक्षा अभियानांतर्गत अनुदानित व जि प च्या शाळांना दिला जाणारा मोफत गणवेश आता पालकांनी बाजारात विकत घेऊन शाळेला बिल सादर करणे बंधनकारक केले असून बिल सादर केल्यानंतर शाळा व्यवस्थापन पालकांच्या खात्यांमध्ये गणवेशाचे बिल अदा करणार आहे. या शासनाच्या नव्या निर्णयामुळे पालकांची चांगलीच तारांबळ उडणार असल्याचे चित्र आहे . मात्र शासनाच्या या निर्णयाची अमलबजावणी शाळा व्यवस्थापन करतील का हा देखील प्रश्न आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून शाळेतून विद्यार्थ्यांना गणवेश देणे सुरु आहे. शाळा व्यवस्थापनाकडून एखाद्या दुकानदाराला साठे लोटे पद्धतीने गणवेशांचा कंत्राट दिला जात होता. त्यामुळे शासनाकडून गणवेशासाठी प्राप्त होणार्या निधीत भ्रष्ट्राचार फोफावण्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्या पार्श्भूमिव्र शासनाने नवीन नियम लागू केला आहे. मात्र शासनाच्या या नियमाला शिक्षक तसेच पालकवर्गाकडून नाराजी व्यक्त होत आहे. नियमाचे पालन शाळांनी केले तरी पालकांकडून होणार नसल्याची ओरड शिक्षक वर्गातून होत आहे. कारण शाळेतून गणवेश मिळतो हे जाणून असलेले पालक नवीन नियमाला प्रतीसाथ देत नसल्याचे शाळांचे म्हणणे आहे . तर ग्रामीण भागात पालकांची स्थिती पाहता पालकांना ते शक्य नसल्याचे बोलले जात आहे.
पटसंख्या टिकवण्यासाठी कसरत
जिल्ह्यातील वाडी वस्तीवर सुरु असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनाही पटसंख्या टिकवण्यासाठी परिश्रम घ्यावे लागत आहेत. धुळे जिल्ह्यात शहर व परिसरात अशीच काहीशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. खासगी शाळांमुळे पुरेशा पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा व शासनाच्या अनुदानित विद्यालयांचे पुढील काळात अस्तित्व धोक्यात येऊन हे क्षेत्र भांडवलदारांच्या व शैक्षणिक क्षेत्राशी कोणताही संबंध नसलेल्या व्यक्तींच्या हाती जाण्याची स्थिती निर्माण होऊ शकते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सध्या धुळे जिल्ह्यात एकूण 1300 हून अधिक शासनाच्या अनुदानित जि. प. प्राथमिक, माध्यमिक विद्यालयासह खासगी तसेच आश्रम व नगर पालिकेच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता चांगल्या दर्जाची जरी असेल परंतु जिल्यातील विनाअनुदानित खाजगी शाळांच्या पोस्टर बाजी जाहिरातीमुळे पालकांची मानसिकता विखुरली जात आहे. परिणामी या शाळांच्या स्पर्धेत शाळा निवड करतांना विद्यार्थी पालक भरडले जात आहेत.
खाजगी शाळांची जाहिरातबाजी
उन्हाळी सुट्टीच्या दिवसांमध्ये खासगी शाळांच्या स्कूलबसवर बॅनर जाहिरातबाजीसाठी लावण्यात आल्याचे दिसून आले. शाळांची जाहिरात असलेले परिपत्रक रोजच पहावयास मिळत होते. वास्तविक धुळे जिल्ह्यात अनुदानित असलेल्या विद्यालयांची शैक्षणिक गुणवत्ता चांगल्या दर्जाची आहे. मात्र, या संस्था देखील स्पर्धेत शामिल झाल्या आहेत. अनुदानित शाळांनादेखील खासगी शाळांच्या मार्केटिंगचा सामना करावा लागत आहे. आपण सुरु केलेली शाळा कशी चांगल्या गुणवत्तेची आहे आणि सध्या शिक्षण घेत असलेला पाल्य म्हणजेच दुसरी शाळा कशी दर्जाहीन आहे याचीच जाहिरातबाजी खासगी संस्थाचालक -कर्मचारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. आपल्याच शाळेत मुलाने प्रवेश घ्यावा याची गळ घातली जात असल्याचे व हा प्रकार सुरु असल्याचे काही पालकांचे म्हणणे आहे. खासगी शाळांनी इतर शाळांबरोबर स्पर्धा जरूर करावी परंतु पुढची पिढी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम कशी होईल या वर भर देणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील शाळा : धुळे तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 226 ,खाजगी 27 ,मनपा 23 तर आश्रमशाळा एकूण 13 आहेत. तर शिरपूर तालुक्यात 264 जिल्हा परिषदेच्या,37 खाजगी,9 नगरपालिका ,तर 18 आश्रमशाळा आहेत. शिंदखेडा तालुक्याची शाळांची संख्या जि. प.च्या 168 , खाजगी 44, नगर पालिका 6 तर आश्रम शाळा 11 आहेत. साक्री तालुक्यात सर्वाधिक जिपच्या शाळा 448 आहेत. तर खाजगी 20 ,आश्रम 19 शाळा आहेत. जिल्ह्याभरात वाडी -वस्तीवर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक 1106 शाळा सुरु आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धा सुरु झाली आहे. आणि त्यामुळे प्राथमिक शाळामधून विद्यार्थी पटावरची संख्या कमी होताना दिसत आहे.
– ज्ञानेश्वर थोरात, धुळे 9850486435