बारामती । स्पर्धा परीक्षेत अनेकदा अपयश येते. मात्र परिश्रम केल्यास यश नक्कीच मिळते. स्पर्धापरीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमाला अत्यंत सकारात्मकरित्या आणि नियोजनबध्दरित्या सामोरे जाण्याची आवश्यकता आहे, असे मत डॉ. तुषार घोरपडे यांनी व्यक्त केले आहे. बारामतीतील युनिक अकॅडमीच्या वतीने स्पर्धा परीक्षासंदर्भात मोफत कार्यशाळा आयोजित कण्यात आली होती. या कार्यशाळेत ते बोलत होते.
शॉर्ट फिल्ममधील कलाकारांचा सत्कार
घोरपडे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत निवड झाली आहे. त्याबाबत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पुजा अहिवळे, स्नेहल रूपनवर, पुष्पांजली पवार, अनिल जाधव, सुरज पवार, शेखर चव्हाण यांच्या हस्ते फेटा बांधून त्यांना सन्मानित करण्यात आले. बारामतीतील कलाकारांनी तयार केलेली लढत आय.ए.एस. ही शॉर्ट फिल्म यावेळी दाखविण्यात आली. यानिमित्त फिल्मचे निर्माते सचिन खलाटे, पटकथा लेखक विजयसिंह घाडगे, सहायक दिग्दर्शक अथर्व गोसावी, कलाकार रविंद्र जगताप, मंगल बोरावके, रामदास जगताप, सुमित साळुंखे, प्रतिक क्षिरसागर, भरत शिंदे, सुभाष मदने, कॅप्ट. निखिल जाधव, राकेश पुरबिया यांचा सत्कार करण्यात आला.
योग्य नियोजन गरजेचे
पुर्व आणि मुख्य परिक्षेच्या अभ्यासाची तयारी करण्याबरोबरच त्याचे एकत्र नियोजन केल्यास त्याचाफायदा विद्यार्थ्यांना निश्चितच होतो. नियोजनपूर्वक आणि योग्य दिशेने केलेली तयारी विद्यार्थ्यांना यश मिळवून देण्यास उपयुक्त ठरते. परिक्षेच्या बदलत्या स्वरूपाचे महत्त्वाचे योग्य आकलन करून वेळ व अभ्यासाचे ते उपघटकानुसार नियोजन करणे हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते, असे डॉ. घोरपडे यांनी सांगितले.
युपीएससीत महाराष्ट्राची बाजी
विद्यार्थी मोठ्या संख्येने स्पर्धापरीक्षांमध्ये उतरत आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थी चांगल्या प्रमाणात युपीएससीमध्ये यश मिळवत असल्याचे गेल्या पाच वर्षांपासून दिसून येत आहे. या अभ्यासक्रमाकडे ज्ञान या दृष्टीने पाहिले पाहिजे. या ज्ञानाचा जीवनात खूप मोठा फायदाच होणार आहे, असे युनिक अकॅडमीचे प्रकल्प व्यवस्थापक प्रा.नागेश गव्हाणे यांनी सांगितले. वसंत घ्ाुले, सुगंधा तरंगे, आरजू पठाण, योगेश होले, भाग्यश्री जगताप, सुशांत शिंदे, आरती हराळे, तृप्ती रणवरे, मोनिका देवकर, प्रियंका साळवे, पल्लवी बनसोडे, देवश्री जाधव, सुप्रिया पिसे, रेशमा पाटील आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल मोरे तर आभार स्नेहल रूपनवर यांनी मानले.