पिंपरी-चिंचवड : आर्थिक परिस्थिती बेताची असणार्या सर्वसाधारण कुटुंबातून आलेले विद्यार्थीदेखील शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाखाली यशाची शिखरे पादाक्रांत करू शकतात. मागील दहा वर्षांत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होणार्यांमध्ये ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढता आहे. यात शिक्षकांचे योगदान महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुधाकर जाधवर यांनी केले. भगवान सेना पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणार्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पिंपरीतील आचार्य अत्रे सभागृहात आयोजित केला होता. या कार्यक्रमप्रसंगी प्रा. डॉ. जाधवर बोलत होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, एसएससी बोर्डाचे सचिव प्रा. बी. के. दहिफळे, जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी सुधाकर पाखरे, उद्योजक आबा नागरगोजे, नगरसेवक केशव घोळवे, नगरसेविका योगिता नागरगोजे, भगवान सेनेचे अध्यक्ष सुभाष दराडे आदींसह पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
मुलांना जबाबदारीची जाणीव करून द्या
डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले, सध्याची तरुण पिढी ‘गॅझेट’मध्ये गुरफटून जात असल्याने त्यांचा पालकांशी, मित्र, मैत्रिणींशी व शिक्षकांशी संवाद दुरावत आहे. यामुळे मुलांच्या स्वभावात व वर्तणुकीत लक्षणीय बदल घडत आहे. मुलांना प्रेरणा देऊ शकेल, असे साहित्य पालकांनी व शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाद्वारे या गॅझेटमधून दिले पाहिजे. मुलांना योग्य वयात जबाबदारीची जाणीव करून द्यावी. योग्य मार्गदर्शन केल्यास त्यांना कोणतेही ध्येय साध्य होऊ शकते. त्यांना परिस्थितीची जाणीव करून देणे, हे पालकांचे काम आहे. तसेच पालकांनीदेखील जबाबदारीने वागले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
संयोजनात यांचा हातभार
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दीपक नागरगोजे, काका मुंडे, किसन केंद्रे, विकास आघाव, प्रसाद खेडकर, अमोल जायभाये, आदिनाथ माळवे, बबन गर्जे, गोविंद इप्पर, अरूण गीते, समीर खाडे, अनिल जायभाये, पांडुरंग फुंदे, खंडू खेडकर, अमोल नागरगोजे, अरूण घोळवे, रामदास कावळे, एस. एस. नाकाडे, ज्ञानेश्वर नागरगोजे, रवी बांगर, तुकाराम बांगर, मच्छिंद्र गीते, विठ्ठल नागरगोजे, नितीन खाडे, राहुल नागरगोजे, गणेश खाडे, संभाजी नागरगोजे, गजानन सोनुने, हौसराज सानप, भागवत खेडकर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शांतीलाल दहिफळे व सुप्रिया पांडे यांनी केले. प्रास्ताविक गणेश ढाकणे यांनी केले. आभार जयप्रकाश दहिफळे यांनी मानले.