मुंबई । राज्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा मोठा विद्यार्थी वर्ग आहे. मात्र, स्पर्धा परीक्षेत डमी उमेदवार बसवून चुकीच्या मार्गाने शासकीय सेवेत नोकरी मिळवली जाते. राज्यात असा मोठा रॅकेट सक्रिय असून अनेक ठिकाणी हे उघड झाले आहे. यामुळे खर्या परीक्षार्थींचे नुकसान होत आहे. याबाबत विधानपरिषदेत चर्चा करण्यात आली व संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली. स्पर्धा परीक्षेत अनुचित प्रकार घडत असल्याचे प्रकरण समोर येत असून आगामी काळात असे प्रकार घडू नये यासाठी शासन सर्वतोपरी खबरदारी घेईल, असे आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी दिले. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्या परीक्षेत डमी उमेदवार बसवण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते.
शिष्टमंडळाशी चर्चा
स्पर्धा परीक्षेतील अपहाराबाबत आझाद मैदान येथे परीक्षार्थी आंदोलन करत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरल्या जाणार्या पदांची संख्या वाढावी, अशी मागणी होत आहे. या आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना आश्वासित करण्याची मागणी मुंडे यांनी केली. दरम्यान, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी परीक्षार्थीच्या शिष्टमंडळाशी भेट झाली असून, त्यांच्याशी चर्चा करण्यात आली असल्याची माहिती दिली.
या प्रकरणाची चौकशी सुरू असून 49 जणांवर याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्यात आले असून आवश्यकता भासल्यास सीआयडी मार्फत याची चौकशी केली जाईल, असे आश्वासनही मदन येरावार यांनी दिले. योगेश जाधव या तरुणाने हे प्रकरण उघडकीस आणले असून त्यास धमकी देणार्याचीही चौकशी सुरू आहे, असे येरावार यांनी सांगितले.
नकारात्मक वातावरण
शासकीय सेवेत येण्यासाठी अनेक जण केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करतात. अनेक वर्षे यात ते घालवत आहेत. मात्र, असे डमी उमेदवार बसवण्याचे प्रकार समोर येत असेल तर हे शासनाने याचा विचार करावा, स्पर्धा परीक्षेबद्दल नकारात्मक वातावरण तयार झाले असून, वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.