स्पर्धा परीक्षेसाठी चतुरस्त्र व्यक्तिमत्व आवश्यक , आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पिंपरी चिंचवड : स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चतुरस्त्र व्यक्तिमत्व विकसित करणे आवश्यक आहे. आपले छंद जोपासणे व्यक्तिमत्व विकासासाठी महत्वाचे असल्याचे मत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील 20 विद्यार्थी व केंद्र प्रमुख डॉ. शिवाजी भोसले यांनी मनपास भेट दिली. त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करताना आयुक्त श्रावण हर्डीकर बोलत होते.
न आवडणार्या विषयांचा देखील अभ्यास असावा…
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, डोंबिवलीमध्ये राहत असताना प्रवासामध्ये 3 तास खर्ची होतात म्हणून मी पुण्यामध्ये शिकायला आलो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आवडीच्या विषयांबरोबरच न आवडणार्या विषयांचे देखील मी वाचन करत राहिलो. त्यांची माहिती घेत राहिलो. स्पर्धा परीक्षेसाठी विषय निवडताना विद्यार्थ्यांनी आपला आवडीचा विषय निवडावा जेणे करून त्याचा फायदा निश्चितच होईल. भाषांवर प्रभुत्व मिळवणे देखील आवश्यक आहे. भाषेतील सौंदर्य समजून घेतल्यास नक्कीच भाषेवर प्रभुत्व मिळविता येते. विद्यार्थ्यांनी कोणत्याही विषयांवर स्वतःचे मत मांडण्यापूर्वी त्या विषयांचा इतरांच्या नजरेतून देखील विचार करावा. पदवीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कौशल्य वृद्धीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही ते म्हणाले. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना महापालिकेची माहितीपर चित्रफित दाखविण्यात आली. तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सुधीर बोराडे यांनी महानगरपालिकेचा अर्थसंकल्प, कामकाज, विविध विभाग यांच्या कामकाजाबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच सारथी या तक्रार निवारण प्रणालीबाबतची माहिती विद्यार्थ्यांना दिली व विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासन केले.