स्पर्धा परीक्षेसाठी ध्येयनिश्‍चिती असते महत्त्वाची

0

शिक्रापूर । स्पर्धा परीक्षेसाठी स्वत:ला परीपूर्ण करण्यासाठी ध्येयनिश्‍चिती हा प्रमुख मार्ग आहे, असे प्रतिपादन राज्य महामार्ग सुरक्षा पुणे विभागाचे पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांनी केले.जातेगाव बुद्रुक (ता.शिरूर) येथील संभाजीराजे विद्या संकुलात आयोजिय ‘स्पर्धा परीक्षेची तयारी’ या विषयावर मार्गदर्शन करताना तांबे बोलत होते. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. विरधवल करंजे, मच्छिंद्र गायकवाड, लधाराम पटेल, प्राचार्य रामदास थिटे, पांडूरंग कोरडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

यशस्वी होण्याचे अनेक मार्ग आहेत. शिक्षण घेत असताना प्रत्येकाने ध्येय व उद्दिष्ट निश्‍चित करणे आवश्यक आहे. मी शिक्षण का घेतो? हा प्रश्‍न स्वत:ला विचारून उद्दीष्टांचा पाठलाग करावा. ध्येय निश्‍चिती, आई-वडीलांशी चर्चा, मित्र-मैत्रीणींशी संवाद शिक्षकांचे मार्गदर्शन, स्वत:चे आत्मपरीक्षण या पंचसुत्रीचा अवलंब करणे गरजेचे आहे. गरीबी आणि श्रीमंती याचा यश-अपयशाशी काहीही संबंध नसतो. अपयश झाकण्यासाठी माणसे अडचणी सांगतात, अशा समुहाशी मैत्री टाळावी. तुमचा मार्ग निश्‍चित असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. स्वत:च्या कतृत्वावर यश मिळवून जीवन आनंददायी बनवा, असा सल्ला तांबे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रामदास थिटे, सूत्रसंचालन प्रा. गणेश बांगर तर संस्थेचे सचिव प्रकाश पवार यांनी आभार मानले.