स्पर्धा वाढविण्यासाठी ई-बस निविदेला मुदतवाढ

0

17 जानेवारीपर्यंत स्वीकारणार निविदा

पुणे : स्मार्ट सिटीअंतर्गत खरेदी करण्यात येणार्‍या 12 मीटर (बीआटी) ई-बससाठी मागवण्यात आलेल्या ई-निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे. निविदा स्वीकारण्यासाठी यापूर्वी 10 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, जास्त अर्ज यावेत आणि स्पर्धा वाढावी, यासाठी 17 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
याबाबत पीएमपी प्रशासनाने माहिती दिली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील वाहतूक व्यवस्थेत ई-बस खरेदी करण्याचा निर्णय पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार दोन टप्प्यांत भाडेतत्वावर 500 ई-बस खरेदी करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.

प्रतिसाद न मिळाल्याने मुदतवाढ

18 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील 150 ई-बससाठी निविदा जाहीर करण्यात आली होती. यावेळी 25 बसेस 9 मीटर नॉन बीआरटी एसीसाठीच्या निविदा निश्‍चित होऊन बस खरेदी करण्याचे ठरले होते. मात्र, उर्वरित 125 बसेस (12 मीटर बीआरटी) बसेससाठी आवश्यक त्या अटी पूर्ण होत नसल्याने पुन्हा निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. यानुसार 10 जानेवारीपर्यंत निवीदा स्वीकारण्यात येणार होत्या. मात्र, याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनी धावणार

खरेदी करण्यात येणार्‍या एकूण 500 बसेसपैकी पहिल्या टप्प्यातील 150 बसेसाठी 18 सप्टेंबर रोजी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. यावेळी 9 मीटरच्या 25 बसेसाठी आलेली ओलेक्ट्रा (बीवायडी) कंपनीची निविदा निश्‍चित करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्याकडून बस खरेदी करण्याचे ठरले असून येत्या येत्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला शहरात 9 मीटर लांबीच्या 25 बसेस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.