स्पर्धेच्या आयोजनावरून क्रीडामंत्र्यांचा संताप!

0

नवी दिल्ली । राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात वारंवार उशीर होत असल्याने केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी नापसंती व्यक्त केली आहे. या स्पर्धेचे आयोजन लवकरात लवकर करण्याची सूचना भारतीय ऑलिम्पिक संघटनेला केल्या आहेत. गोयल म्हणाले की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन प्रत्येक दोन वर्षांनी व्हायला हवे. मागच्या वेळी चार वर्षांनंतर केरळमध्ये 2015ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. फार विलंबाने मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गोव्यात या स्पर्धा होणार होत्या. पण, आयोजन झाले नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

बैठकीनंतर गोयल म्हणाले,‘माझी आज आयओए प्रमुखांसोबत दीर्घ चर्चा झाली. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन वेळेवर व्हायला हवे, असे मी त्यांना सांगितले. त्यांनी मला लवकरच गोव्याचा दौरा करीत आयोजनाबाबत तयारी करण्याचे आश्वासन दिले आहे.’ बैठकीला क्रीडा सचिव इंजेती श्रीनिवास उपस्थित होते. राष्ट्रीय क्रीडा महासंघांमध्ये सुरू असलेल्या वादावर लवकरात लवकर तोडगा काढण्याच्या सूचना केल्या आहेत. आशियाड आणि आशियाई बीच क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासंदर्भातही चर्चा करण्यात आली. पुढील तीन आशियाई स्पर्धा स्थळे आधीच निश्चित झाली आहेत. भारताला 2020 च्या बीच आशियाई स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची मात्र संधी असेल.