स्पर्धेच्या युगात उच्चशिक्षणाशिवाय पर्याय नाही : ऋषीकेश पवार

0

शेलपिंपळगाव । ग्रामीण भागातील मुलांना डिजिटलायझेशनकडे घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न असून आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये उच्च शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून तरुण पिढीने भविष्याचा वेध घेऊन योग्य शिक्षण घेतले पाहिजे, असे उपसरपंच व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ऋषीकेश पवार यांनी सांगितले. श्री शरदचंद्र विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

गुणवंतांचा गौरव
2016-2017 च्या दहावीच्या परिक्षेत उत्तम गुण मिळवून खेड तालुक्यातील वडगाव घेनंद येथील शरदचंद्र विद्यालयात पहिल्या तीन क्रमांकावर येणार्‍या विद्यार्थ्यांना पवार यांच्यातर्फे लॅपटॉप बक्षीस म्हणून देण्यात आले. प्रिती घेनंद, स्नेहल बांदल, श्रद्धा गायकवाड या मुलींना रमेश पवार यांच्या हस्ते लॅपटॉप व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धात्मक वातावरणाची गरज
श्री शरदचंद्र विद्यालयाचा गेली दहा वर्षे सातत्याने 100 टक्के निकाल लागत असून मुलांची अधिकाधिक शैक्षणिक प्रगती होण्यासाठी स्पर्धात्मक वातावरणाचीही गरज आहे. त्यासाठी दहावी नंतरच्या पुढील शिक्षणास उपयुक्त असणारा लॅपटॉप बक्षीस म्हणून गेल्या 4 वर्षांपासून देण्यात येत आहे. दहावीत शाळेत प्रथम क्रमांक मिळविणार्‍या विद्यार्थ्याला तो देण्यात येतो. परंतु विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षापासून पहिल्या तीन क्रमांकावर येणार्‍या विद्यार्थ्यांना लॅपटॉप बक्षीस म्हणून देण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती पवार यांनी दिली.

विद्यार्थ्यांना घेतले दत्तक
मुख्याध्यापक अंकुश सांडभोर व अमित घेनंद यांनी विद्यालयातील पाच गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेतले असून अमित घेनंद स्पोर्ट्स फाउंडेशनकडून विद्यालयास 10 हजार रुपयांचे क्रीडा साहित्य भेट देण्यात आले. सरपंच ललिता नितनवरे, उपसरपंच मारुती बवले, ग्रामपंचायत सदस्य, श्री माउली शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.