स्पर्धेच्या युगात ‘ब्रँडिंग’ काळाची गरज : आयुक्त हर्डीकर

0

‘डब्ल्यू.टी.ई. इन्फ्रा.’ कंपनीच्या मासिकाचे अनावरण

चिंचवड : स्पर्धेच्या युगामध्ये कोणत्याही कंपनीला ‘ब्रँडिंग’ करण्याशिवाय पर्याय नाही. ‘ब्रँडिंग’मुळेच अनेक जागतिक कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत टिकाव धरला आहे. व्यवसाय क्षेत्रात आपला पाया भक्कम करण्यासाठी आपल्याला स्पर्धक बनावेच लागेल, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी व्यक्त केले. येथील ऑटो क्लस्टर सभागृहात भोसरीतील डब्लू. टी. ई. इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लि. कंपनीच्या वतीने ‘वॉटर वर्ल्ड’ या मासिकाचे अनावरण आयुक्त हर्डीकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे, भाजपचे सरचिटणीस सारंग कामतेकर, महापालिकेतील पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, कंपनीचे संचालक अशोक कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, विनोद भोळे, रंगनाथ रणपिसे, नितीन घाडगे यांच्यासह कामगार उपस्थित होते.

तांत्रिक गोष्टींची गरज जाणतो
हर्डीकर पुढे म्हणाले की, डब्लू.टी.ई. कंपनीने स्वतःचं ‘वॉटर वर्ल्ड’ या मासिकाचा अंक प्रसिध्द करून एका अनोख्या क्षेत्रात ठसा उमटविला आहे. कंपनीचा हा प्रयत्न अन्य कंपन्यांसाठी प्रेरणादायी आहे. मी एक तांत्रिक अभियंता असल्याने पाण्यावरील प्रक्रीया आणि त्यासाठी लागणार प्रयत्न तसेच तांत्रिक गोष्टींची गरज आणि महत्व जाणून आहे. व्यावसायिकता हे कोणत्याही कंपनीचे प्रथम उद्दीष्ट असते. परंतु, आपण ‘ब्रँडिंग’ या घटकाला कमी महत्व देतो. जर आपली कंपनी जागतिक स्तरावर पोहोचवायची असेल, तर कंपन्यांनी व्यावसायिकता आणि दर्जा टिकविला पाहिले. शासकीय नोकरी करताना व्यावसायिक उत्कृष्टता जपावी लागते. परंतु, खासगी क्षेत्रात काम करताना सातत्याने सुधारणा कराव्या लागतात. यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून आणि सर्वोत्तम ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा वापर करून खर्च कमी करण्यावर भर द्यावा लागतो.

जगाशी संपर्क वाढवता येईल
कंपनीचे संचालक प्रसाद कुलकर्णी म्हणाले की, केवळ कंपनीमध्ये अंतर्गत संवाद घडविण्यासाठी या मासिकाचे अनावरण केले नसून, यामुळे जगाशी संपर्क वाढवता येणार आहे. ‘वॉटर वर्ल्ड’ मासिक कंपनीला कागदोपत्री मदतीचे ठरणार आहे. पहिल्या अंकात कंपनीची 200 स्क्वेअर फुटापासून ते 40 हजार स्क्वेअर फुट आणि पाच कामगारांपासून ते 300 कामगारांपर्यंत कंपनीच्या यशाची वाटचाल अधोरेखित करण्यात येणार आहे.