माजी मंत्री एकनाथराव खडसे : विरोधी पक्ष नेता असताना आपला होता दरारा
रावेर- जनतेचे प्रश्न मी परखडपणे मांडतो व ते सोडविण्यासाठी भांडतो म्हणून माझ्या या कडक स्वभावामुळे मी नकोसा झालो आहे, अशी खंत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली. वाघोड येथे गण व बुथ प्रमुखांचा शनिवारी मेळावा झाला. याप्रसंगी एका कार्यकर्त्याने रस्त्याच्या प्रश्नाबद्दल छेडले असता खडसे यांनी खंत व्यक्त केली. नाथाभाऊ फटकण बोलतो म्हणून हा नकोच, असे सांगत खडसे म्हणाले की, मी तोंडावर व स्पष्ट बोलणारा आहे, खुर्चीचा भुकेलेला अजिबात नाही, मंत्री करा अथवा न करा त्यामुळे फरक पडत नाही, असेही ते म्हणाले.
विरोधी पक्ष नेता असताना होता दरारा
मी विरोधी पक्षनेता असताना मुख्यमंत्र्यांना फोन लावत होतो व काय मुख्यमंत्री साहेब, काय चालले आहे? असे विचारताच मुख्यमंत्री काय झाले साहेब म्हणत विचारत होते व येथे खड्डे पडले आहे, असे म्हणताच मुख्यमंत्र्यांकडून उद्याच खड्डे भरतो, असे उत्तर मिळत असल्याची आठवणही खडसेंनी सांगितली. रस्त्यांच्या दुर्दशेचचा संदर्भात ते म्हणाले की, लोकच आता म्हणत आहे की नाथाभाऊ पदावर होते तेव्हा असे आपले हाल नव्हते पण हरकत नाही, आपले माय-बाप सरकार आहे, हळूहळू कामे मार्गी लावू, जनतेच्या मनातील बाब आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार असल्याचे खडसे म्हणाले.
राज्यमंत्र्यांच्या विधानानंतर उडाली खळबळ
शुक्रवारी रात्री मुक्ताईनगर येथील एका कार्यक्रमात राज्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंचा नामोल्लेख टाळत त्यांचा आता मंत्री मंडळात प्रवेश होणार नाही, अशी मुख्यमंत्र्यांचीदेखील ईच्छा आहे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचीदेखील यास पुष्टी असल्याचा दावा केला होता तर या विधानाने खळबळ उडाली असतानाच खडसेंनी वाघोडच्या गण व बूथ प्रमुखांचा कार्यकर्ता मेळाव्यात केलेल्या विधानाने खळबळ उडाली आहे. दरमयान, खडसेंनी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व केंद्र सरकाच्या योजनांचे व कामांचे तोंडभरून कौतुक केले तसेच बुथ प्लस व ओव्हरफ्लो करण्याचे आवाहनही केले.